वाडा: पालघरमधील गडचिंचले साधू हत्याप्रकरणातील ११ आरोपींना करोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. गडचिंचले प्रकरणातील १७ आरोपी न्यायालयीन कोठडीत वाडा पोलीस ठाण्यात अटकेत होते. तीन दिवसांपूर्वी या आरोपींना वाडा पोलीस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या आरोपींची करोना चाचणी केल्यानंतर १७ पैकी ११ जणांना संसर्ग असल्याचे पुढे आले आहे. या कोरोना बाधीतआरोपींना न्यायालयाच्या परवानगीने वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती वाड्याचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी लोकसत्ताला दिली.

लॉकडाउन असताना गुजरात राज्यात आडमार्गाने प्रवेश घेऊ पाहणार्‍या मुंबई येथील तीन व्यक्तींची दादरा नगरहवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून निर्घृणपणे हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी ग्रामस्थांना ताब्यात घेतलं असून पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले होतं. या दुर्देवी घटनेत मृत्यू झालेल्यामध्ये चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70 वर्ष), सुशिलगिरी महाराज (35 वर्ष) व निलेश तेलगडे (30 वर्ष) यांचा समावेश आहे.