देहू नगरीत आज जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे शासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तीसह प्रस्थान होणार आहे. परंपरागत आणि ग्यानबा तुकारामाच्या गजरात मुख्य मंदिरात हा सोहळा पार पडणार आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षीचा पालखी सोहळा अगदी वेगळा असून, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  देहू नगरीत वारकरी संप्रदायाला न येण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.  आहे त्या ठिकाणाहूनच या पालखी सोहळ्याचे थेट प्रक्षेपणाद्वारे वारकऱ्यासंह भाविनकांनी दर्शन घ्यावे असे  देखील सांगण्यात आले आहे.

सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून याचा थेट फटका धार्मिक सोहळ्याना बसला आहे. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३५ वा पालखी सोहळा पार पडत आहे. परंतु, देहू नगरीत अत्यंत शांततामय वातावरण असून देवस्थान यांच्याकडून करण्यात आलेल्या आवाहनाला वारकरी संप्रदायाने प्रतिसाद दिलेला दिसत आहे. दरवर्षी ग्यानबा तुकारामाचा जयघोष देहू नगरीत असतो. मात्र, यावर्षी मुख्य मंदिरात काही मोजक्याच प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे सध्या देहू नगरीत पोलिसांव्यतिरिक्त अन्य कोणी दिसत  नाही.

देवस्थानाकडून शासनाने दिलेल्या नियमांचं पालन केले जात असून आषाढी एकादशीच्या दिवशी (३० जून) हेलिकॉप्टर किंवा शासन देईल त्या वाहनाने पालखी (पादुका) पंढरपुरात दाखल होणार आहेत, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त संजय महाराज मोरे यांनी दिली आहे. मंदिराच्या लगतच इंद्रायणी नदी वाहते याच नदीत लाखो वारकरी अभ्यंग स्नान करत असतात. मात्र, यावर्षी वारकरी नसल्याने नदी काठी शांतता दिसत आहे.