माउलींच्या पालखीचे आज आळंदीतून प्रस्थान
पंढरपुरीच्या सावळ्याच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वैष्णवांच्या भक्तिकल्लोळात जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या ३३१ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी संध्याकाळी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. तुकाराम, तुकाराम असा अखंड घोष अन् टाळ- मृदंगाचा गजर करीत वैष्णवांनी प्रस्थान सोहळ्यात हरिभक्तिचे रंग भरले. दरम्यान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी मंगळवारी (२८ जून) आळंदीतून प्रस्थान ठेवणार आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी अलंकापुरीत लाखोच्या संख्येने वारकरी दाखल झाले आहेत.
तुकोबांच्या पालखी प्रस्थानाच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी पहाटेपासूनच देहूनगरीत उत्साही वातावरण होते. पहाटे मुख्य मंदिर व शिळा मंदिरात पालखी सोहळा प्रमुख अशोक नि. मोरे, विश्वस्त अभिजित मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. त्यानंतर विविध धार्मिक विधींनंतर सकाळी दर्शनबारी सुरू करण्यात आली. दर्शनाला जाण्यापूर्वी स्नान करण्यासाठी भल्या पहाटेच इंद्रायणीचा काठ वैष्णवांनी फुलून गेला होता. सकाळी दहाच्या सुमारास ‘पाहती गवळणी, तवती पालथी दुधानी..’ या अभंगावर तुकोबांचे वंशज संभाजीमहाराज मोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर इनामदारवाडय़ात तुकोबांच्या पादुका आणून महापूजा करण्यात आली. मानकरी म्हसलेकर यांनी परंपरेप्रमाणे पादुका डोक्यावर घेऊन वाजत-गाजत त्या मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या. त्यानंतर प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. या सोहळ्यास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पाटबंधारे मंत्री बबन लोणीकर, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.
पादुकांची पूजा सुरू असतानाच दुसरीकडे मंदिराच्या आवारामध्ये टाळ- मृदंगाचा गजर सुरू झाला. त्या बरोबरीने वारकऱ्यांचे विविध खेळही रंगले. वारकऱ्यांबरोबरच मंत्र्यांनीही फुगडीचा आनंद लुटला. पालखी प्रस्थानाची तुतारी वाजली अन् पुंडलिक वरदे, हरि विठ्ठल, असा घोष करीत देहूकरांनी पालखी खांद्यावर घेतली. त्यामुळे वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण झाले. मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदारवाडय़ात आजोळघरी पोहोचली.
दरम्यान, माउलींच्या पालखीचे मंगळवारी आळंदीतून प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक अलंकापुरीत दाखल झाले आहेत. सोहळ्यातील श्रींच्या अश्वाचे अंकलीहून सोमवारी शाही लवाजम्यासह आगमन झाले.

दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पालख्यांचे उद्या शहरात आगमन
पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे बुधवारी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी शहरात आगमन होणार आहे. पालख्यांच्या संगतीने पुण्यनगरीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या भक्तिभावाला सेवाभावाची जोड देण्यासाठी पुणेकरांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.
तुकोबांच्या पालखीने सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. ही पालखी मंगळवारी आकुर्डी मुक्कामी असणार आहे. त्यानंतर बुधवारी पुणे- मुंबई महामार्गाने पालखीचा शहरात प्रवेश होणार आहे. माउलींच्या पालखीचे मंगळवारी संध्याकाळनंतर प्रस्थान होणार असून, त्या दिवशीचा मुक्काम आळंदीतच असणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. आळंदी रस्ता, संगमवाडीमार्गे पालखी शहरात येणार आहे. तुकोबा व माउलींची पालखी पाटील इस्टेट येथे एकत्र येणार आहेत. या ठिकाणी पालख्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, संचेती रुग्णालयासमोरून आकाशवाणी चौक व कृषी महाविद्यालय चौकमार्गे दोन्ही पालख्या फग्र्युसन रस्त्याने पुढे जातील. मार्गावर पादुका चौकामध्ये आरती करण्यात येईल. पुढे लक्ष्मी रस्त्याने तुकोबांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात, तर माउलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी जाईल. बुधवार व गुरुवार (२९ व ३० जून) या दोन दिवशी पालख्यांचा मुक्काम शहरातच असणार आहे. १ जुलैला सकाळी सहाच्या दरम्यान दोन्ही पालख्या पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होतील.

Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
dharashiv, show of strength dharashiv
धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात

महापालिकेकडून पालखी सोहळ्यासाठीची तयारी पूर्ण
पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे आगमन बुधवारी (२९ जून) पुण्यात होत असून पालख्यांच्या आगमनाची तयारी महापालिका प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. वारकऱ्यांची निवासाची व्यवस्था महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये करण्यात येणार असून त्या दृष्टीने शाळांमध्ये वीज, पाणीपुरवठा, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून पालखी मार्गावर दरवर्षीप्रमाणे महापालिकेने फिरती स्वच्छतागृह उपलब्ध करून दिली आहेत.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान सोमवारी झाले, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मंगळवारी (२८ जून) आळंदीहून प्रस्थान करणार आहे. या दोन्ही पालख्या बुधवारी पुण्यात मुक्कामी असतील. त्यांच्या स्वागताची तयारी केली जात असतानाच, महापालिकेने वारकऱ्यांची गरव्यवस्था होणार नाही याची काळजी घेतली आहे.
दोन्ही पालख्यांसमवेत येणाऱ्या िदडय़ांपैकी अनेक दिंडय़ा व वारकरी महापालिकेच्या शाळांमध्ये निवासासाठी असतात. या शाळांमध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता आणि स्वच्छतागृहांची साफसफाई यासारख्या गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच, वारकऱ्यांचा मुक्काम दोन दिवस या शाळांमध्ये असल्याने तेथे आवश्यक साधनसामग्रीचा पुरवठा करण्यात आला आहे. शहरात स्वच्छता राहण्याच्या दृष्टीने पालखी मार्गावर चौदाशे जादा कंटेनर ठेवण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली.

पालखी आगमनानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत आज, उद्या बदल
पुणे– संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन शहरात होणार आहे. या पाश्र्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी (२८ जून) बदल करण्यात येणार आहे. तसेच दोन्ही पालख्यांचे आगमन बुधवारी (२९ जून) पुणे शहरात होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बुधवारी मोठय़ा प्रमाणावर बदल करण्यात येणार आहेत. श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीने सोमवारी देहू गावातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. मंगळवारी (२८ जून) श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन पिंपरी-चिंचवड शहरात होणार आहे, त्यामुळे देहू फाटा ते भक्ती-शक्ती चौक (निगडी) या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर येथून बुधवारी (२९ जून) पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. त्यामुळे जुन्या पुणे- मुंबई रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. याचदिवशी श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदीहून पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. या दोन्ही पालख्या जुन्या पुणे-मुंबई रस्त्याने पुण्यात मुक्कामी पोहोचतील. पालखी आगमनाच्या पाश्र्वभूमीवर वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा तसेच वाहतूक पोलिसांना सहकार्य करून सूचनांचे पालन करावे. वाहनचालकांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी दूरध्वनी- २६१२२००० किंवा २६२०८२२५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.
नाना-भवानी पेठेतील वाहतूक व्यवस्थेत बदल
संत तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामी येणार आहे, तर श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी येणार आहे.
दोन्ही पालख्या १ जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहेत. या परिसरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन अरुणा चौक ते पारशी अग्यारी (नाना पेठ), पालखी विठोबा चौक ते बाबासाहेब किराड पथ हे दोन रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच या दोन्ही रस्त्यांवर वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
मंगळवारी वाहतुकीसाठी बंद राहणारे रस्ते
देहू फाटा ते भक्ती-शक्ती चौक, भक्ती-शक्ती चौक ते देहू फाटा, दुर्गादेवी चौक ते टिळक चौक, म्हाळसाकांत चौक ते टिळक चौक, जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील निगडी जकात नाका ते खंडोबाचा माळ दरम्यान ग्रेड सेपरेटरमधील दोन्ही बाजू. तसेच पुण्याकडे येणारा सेवा रस्ता वाहतुकीसाठी दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.
बुधवारी शहरातील बंद राहणारे रस्ते
रेंजहिल चौक ते संचेती चौक, खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (फग्र्युसन रस्ता), शनिवारवाडा ते स. गो. बर्वे चौक (शिवाजी रस्ता), वीर चापेकर चौक ते वाकडेवाडी भुयारी मार्ग, तुकाराम पादुका चौक ते बेलबाग चौक (लक्ष्मी रस्ता), बेलबाग चौक ते निवडुंग्या विठोबा मंदिर (नाना पेठ).