पिंपरी पालिकेच्या वतीने पालखी सोहळय़ांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंची यंदा अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी भलतीच धास्ती घेतली आहे. राष्ट्रवादीची सत्ता असताना विठ्ठलमूर्ती खरेदीवरून तर भाजपच्या हातात सूत्रे आल्यानंतर सतरंजी खरेदीतील गैरव्यवहारावरून झालेल्या गंभीर आरोपांमुळे या वर्षी भेटवस्तू खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, लागलीच संभाव्य टीकेच्या भीतीने भेटवस्तू खरेदी केली पाहिजे, असा दुसरा विचारही पुढे आल्याने यावरून खल सुरू आहे.

पालखी सोहळय़ाच्या नियोजनासाठी मुख्यालयात बैठक झाली. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्रवीण आष्टीकर, पोलीस उपायुक्त गणेश िशदे, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांच्यासह संत तुकाराममहाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख अशोक मोरे, सुनील मोरे, सुनील दिगंबर मोरे, विठ्ठल मोरे, नितीन देशमुख आदी उपस्थित होते.

पालखी सोहळय़ासाठी आवश्यक सोयीसुविधा महापालिकेच्या वतीने दरवर्षी पुरवण्यात येतात. त्याचप्रमाणे, पालखीतील िदडय़ांना काही भेटवस्तू देण्याची परंपराही आहे. दोन वर्षांपासून भेटवस्तू खरेदीत होणाऱ्या गैरप्रकारांवरून झालेल्या राजकारणामुळे यंदा भेटवस्तू द्यायची की नाही, अशा संभ्रमावस्थेत पालिका पदाधिकारी व अधिकारी आहेत. राष्ट्रवादी सत्ताकाळातील शेवटच्या टप्प्यात विठ्ठलमूर्ती खरेदी करून देण्यात आल्या. त्यात राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत भाजपने रान पेटवून दिले होते. पुढे, पालिकेत सत्तांतर झाले. तेव्हा पालखीसाठी भाजपने सतरंजी खरेदी करून दिल्या. तेव्हा भाजपने पैसे खाल्ल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. दोन्ही वेळी पालिकेची मोठय़ा प्रमाणात बदनामी झाली.

त्याचप्रमाणे, वारकऱ्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता. या पाश्र्वभूमीवर, आरोप-प्रत्यारोपाची भानगड नको म्हणून यंदाच्या वर्षी काहीही भेटवस्तू न देण्याचा निर्णय पालिका पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीला घेतला. पालखी नियोजनाच्या बैठकीत तसेच ठरले. तथापि, पुन्हा एकदा भेटवस्तू दिली पाहिजे, असा विचार पुन्हा मांडण्यात येऊ लागला आहे.

बैठकीतील प्रमुख मागण्या

  • पालखी मार्गावरील खड्डे बुजवण्यात यावेत, स्वच्छता राखावी.
  • आकुर्डीत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा द्याव्यात.
  • पालखी मार्गावर पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी, अतिक्रमण काढावे.
  • पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.