‘दोस्तोंसे प्यार किया’, ‘सनम तेरी कसम’, ‘प्यार हमें किस मोडपे ले आया’, ‘एक चतुर नार’, ‘बिती ना बितायी रैना’, ‘सिली हवा छु गयी’, ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’, ‘तेरे बिनाजिंदगी से कोई शिकवा तो नही’ अशा पंचम सुरांनी सजलेल्या गीतांचे श्रवण.. गजलगायिका मिताली सिंग यांनी ज्येष्ठ कवी-गीतकार गुलजार, दिग्दर्शक राज सिप्पी आणि पाश्र्वगायक-गिटारवादक भूपेंद्र सिंग यांच्याशी साधलेल्या संवादातून उलगडल्या अवीट गोडीच्या संगीतातील मधुर कथा.. ‘आती रहेंगी बहारे’ हे  गीत ऐकतच  मान्यवरांनी कापलेला केक.. अशी पंचम सुरांनी भारलेली गुलजार सांज रसिकांनी शुक्रवारी अनुभवली.
पंचम मॅजिक संस्थेतर्फे संगीतकार-गायक राहुलदेव बर्मन ऊर्फ पंचमदा यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून दृक-श्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आरडींच्या गीतांमध्ये विविध वाद्यांनी रंग भरणारे ‘काऊ बेल’वादक होमी मुल्लन, ‘रेसोरेसो’वादक अमृतराव काटकर आणि ‘मादल’वादक रणजित गजमेर ऊर्फ कांचाभाई यांनी पंचमदांच्या मूळ गीतावर आपल्या वादनाची झलक सादर करीत रंगत आणली. पंचमदा आजही आपल्यामध्ये आहेत या भावनेतून केक कापून आरडींचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. पंचमदांच्या निवडक ७५ गीतांचे रसग्रहण असलेल्या ‘छोटी सी कहानी से’ या पुस्तकाचे प्रकाशन गुलजार यांच्या हस्ते झाले.
आधी गीत की संगीत याविषयी गुलजार म्हणाले, पहिल्यांदा धून तयार होते आणि नंतर शब्द येतात. पंचम हा उत्स्फूर्ततेचे मूर्तिमंत प्रतीकच. आपण एका ‘जिनीयस’बरोबर काम करतो हे कधी कळलेच नाही. ‘तेरे बिनाजिंदगी से कोई शिकवा तो नही’ हे गीत एका बंगाली गीतावर बेतलेले आहे. मला बंगाली समजत होते. एवढेच नव्हे तर मी बंगाली बोलूही शकतो. याचा चांगला फायदा पंचमने घेतला.
‘पिया तू अब तो आजा’ हे पाश्चात्य संगीतावरचे, ‘रैना बित जाए’ हे शास्त्रीय संगीतावरचे तर, ‘एक चतुर नार’  विनोदी ढंगाचे गाणे करणारा पंचम हा खऱ्या अर्थाने ‘ऑलराऊंडर’ होता, असे मिताली सिंग यांनी सांगितले. पंचम असा प्रतिभाशाली होता की त्याने कोणताही आवाज केला तरी त्याचे संगीत व्हायचे, असे भूपेंद्र सिंग यांनी सांगितले.
 
पाँव छुना मना है
दिग्दर्शक राज सिप्पी यांच्या हस्ते पुणेरी पगडी आणि शाल प्रदान करून गुलजार यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी नमस्कारासाठी सिप्पी खाली झुकले तेव्हा गुलजार यांनी त्यांना थोपवत प्रेमाने आिलगन दिले. ‘आपको पता नही पाँव छुनेके लिये मोदीसाहबने मना किया है’, अशी कोटी गुलजार यांनी करताच प्रेक्षागृहात हास्याचा धबधबा उसळला.