News Flash

‘पंढरीची वारी’ आता जगाच्या व्यासपीठावर

पुण्याच्या वरदा संभूसचा ‘वारी’विषयक शोधनिबंध जर्मनीतील परिषदेत

|| भक्ती बिसुरे

पुण्याच्या वरदा संभूसचा ‘वारी’विषयक शोधनिबंध जर्मनीतील परिषदेत

पंढरपूरची वारीची परंपरा वर वर पाहता धार्मिक वाटत असली तरी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीतील ही एक महत्त्वाची घटना आहे. तीर्थयात्रांच्या माध्यमातून होणारी समाजमनाची जडणघडण वारीच्या वाटेवर पाहायला मिळते. म्हणूनच वारी आता जगाच्या व्यासपीठावर देखील एक आकर्षण ठरत असल्याची भावना वरदा संभूस या पुणेकर तरुणीने व्यक्त केली.

जर्मनीतील बर्लिन येथे होत असलेल्या ‘सॅक्रेड जर्नीज’ या तीर्थक्षेत्रविषयक पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत वरदा महाराष्ट्रातील पंढरपूरच्या वारीविषयी आपला शोधनिबंध सादर करणार आहे. स्पेन, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, श्रीलंका, यूएई आणि दक्षिण कोरिया आदी देशांचे ३० संशोधक या परिषदेत सहभागी होणार आहेत. ४, ५ आणि ६ जुलै दरम्यान अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीच्या युरोप गेटवेतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वरदाने याआधी ऑक्सफर्ड विद्यापीठात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतदेखील सहभाग घेतला असून, ‘मेकिंग वारी ग्लोबल’ हा आपला ध्यास असल्याचे वरदा सांगते.

वरदा म्हणाली, राज्यशास्त्र विषयात पदवी घेऊन मी पुढील शिक्षणासाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दाखल झाले. त्या वेळी संशोधन करायचे हे नक्की होते, मात्र विषय कोणता असावा हे ठरले नव्हते. जेएनयूमध्ये शिकताना मराठी विषयांवर अनेक परदेशी विद्यार्थ्यांनी संशोधन केल्याचे लक्षात आले. त्या वेळी महाराष्ट्राच्या परंपरेचा समृद्ध ऐवज असलेल्या वारीवर संशोधन करण्याचा विचार केला. विठ्ठलासारख्या देवाला मिळालेले माउली हे संबोधन, त्याच्याशी वारकऱ्यांचे असलेले भावबंध, वारीतील व्यवस्थापन, गवळणी, अभंग, भारुडे, कीर्तन, प्रवचन हे सगळे मराठी संशोधक म्हणून त्याच्या भावनिक पैलूंसह इंग्रजीत आणावे असे वाटल्याने वारी हा विषय पीएच.डी. साठी निवडला.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील परिषदेत सर्व परदेशी संशोधकांसमोर वारीविषयी शोधनिबंध सादर करताना दृक्-श्राव्य माध्यमाचा वापर केला. ही दृश्य-वारी पाहता पाहता त्यांच्या चेहऱ्यांवर उमटणारे ‘फॅसिनेशन’ केवळ  अद्भुत होते असे वरदा सांगते. २०११ पासून वरदा वारीमध्ये सहभागी होत आहे. २०१५ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात शोधनिबंध सादर करून परतल्यावर लगेच वरदा वारीत सहभागी झाली होती. यंदाही जर्मनीहून परतताच वारीच्या वाटेवर चालणार असल्याचे वरदाने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 12:05 am

Web Title: pandharpur wari 4
Next Stories
1 शहरबात पिंपरी : पुढचं पाठ, मागचं सपाट!
2 समाजमाध्यमातलं भान :  ‘पुणे मॅक्रोग्राफर्स’ सूक्ष्म छायाचित्रणाचा आगळा छंद
3 पिंपरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून एका मजुराचा मृत्यू
Just Now!
X