वारकऱ्यांसाठी ‘फिरते टपाल कार्यालय’
पंढरपूरच्या वारीस निघालेल्या आणि विठ्ठलनामाच्या गजरात रंगून गेलेल्या जनसमुदायाची टिपलेली छायाचित्रे आता पोस्टकार्डाची शोभा वाढवणार आहेत. वारीसाठी टपाल खात्याने अशी छायाचित्रे छापलेल्या १५ पोस्टकार्डाचा संच उपलब्ध करून दिला आहे. वारीसाठीच्या खास ‘फिरत्या टपाल कार्यालया’द्वारे वारकरी ही पोस्टकार्डे आप्तेष्टांना पाठवू शकतील.
वारीच्या संस्मरणीय प्रसंगांची छायाचित्रे असलेल्या १५ पोस्टकार्डाचा संच फिरत्या टपाल खात्यात सशुल्क उपलब्ध करून दिल्याचे पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल एफ. बी. सय्यद यांनी कळवले आहे. हे फिरते टपाल कार्यालय वारीच्या सर्व नियोजित मुक्कामांवर थांबणार आहे. २९ व ३० जूनला पालखी पुणे मुक्कामी असताना वारकरी फिरत्या टपाल कार्यालयात
‘माय स्टँप’ सेवेअंतर्गत स्वत:चे टपाल तिकीटही काढू शकणार आहेत. या कार्यालयात टपाल तिकिटांच्या विक्रीबरोबरच साधे टपाल, ‘रजिस्टर्ड’ व ‘स्पीड पोस्ट’ सुविधाही उपलब्ध राहतील, असे खात्यातर्फे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे या फिरत्या कार्यालयात ‘मनीऑर्डर’ची सुविधाही मिळणार आहे. त्याद्वारे वारकऱ्यांचे नातेवाईक त्यांना देशभरातून कुठूनही मनीऑर्डर करू शकतील. ही मनीऑर्डर आळंदी देवाची या टपाल कार्यालयाच्या नावे करावी लागणार आहे. वारकरी आपली ओळखपत्र दाखवून फिरत्या टपाल कार्यालयातून या मनीऑर्डरचे पैसे घेऊ
शकतील.