गायन-वादन आणि नृत्य अशा त्रिवेणी संगीताने नटलेल्या ‘गानसरस्वती महोत्सवा’मध्ये यंदा गानसरस्वती किशोरी आमोणकर यांची सकाळच्या रागगायनाची मैफल रसिकांना तीन वर्षांच्या खंडानंतर ऐकण्याची संधी प्राप्त झाली आहे. महालक्ष्मी लॉन्स येथे ७ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता ही मैफल होणार आहे.
जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका किशोरीताई आमोणकर यांच्या सांगीतिक कारकीर्दीला अभिवादन करण्याच्या उद्देशातून नाटय़संपदा प्रतिष्ठानतर्फे ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत गानसरस्वती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे यंदा चौथे वर्ष आहे. या महोत्सवाचा प्रारंभ झाला, त्या वर्षी किशोरीताईंनी सकाळच्या सत्रामध्ये गायन केले होते, असे प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि प्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर यांनी गुरुवारी दिली.
कर्नाटक शैलीचे ज्येष्ठ व्हायोलिनवादक लालगुडी जयरामन यांची कन्या लालगुडी विजयालक्ष्मी यांच्या व्हायोलिनवादनाने ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. किराणा घराण्याचे व्यंकटेश कुमार यांच्या गायनानंतर उस्ताद अमजद अली खाँ यांच्या सरोदवादनाने पहिल्या दिवसाची सांगता होणार आहे. मेवाती घराण्याचे युवा गायक संजीव अभ्यंकर आणि जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर यांच्या गायन मैफलीनंतर बनारस घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. राजन-साजन मिश्रा यांच्या गायनाची मैफल ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महोत्सवात रविवारी (७ फेब्रुवारी) किशोरीताई आमोणकर यांची सकाळी नऊ वाजता गायन मैफल होणार आहे. सायंकाळच्या सत्राचा प्रारंभ विशाल कृष्णन यांच्या नृत्याविष्काराने होणार आहे. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनानंतर पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीवादनाने गानसरस्वती महोत्सवाची सांगता होणार आहे.

हरिजी आणि सुयोग कुंडलकर यांना पुरस्कार
नाटय़संपदा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरौसिया यांना गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार आणि प्रसिद्ध संवादिनीवादक सुयोग कुंडलकर यांना गानसरस्वती किशोरी आमोणकर साथसंगत पुरस्कार जाहीर झाला आहे. महोत्सवातील सांगता सत्रात ७ फेब्रुवारी रोजी पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीवादनाच्या मैफलीपूर्वी किशोरीताईंच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे रघुनंदन पणशीकर यांनी सांगितले.