ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन

गेल्या चार वर्षांच्या नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात महिला, युवक, सामान्य नागरिक, कामगार, शेतकरी, व्यावसायिक अशा सर्व घटकांसाठी विविध योजना सूक्ष्म नियोजन करुन राबविण्यात आल्या आहेत. महामार्ग आणि रेल्वेचे जाळे देशात विणले जात आहे. काही योजनांचे यश दिसून येण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी अपूर्ण आहे. त्यामुळे जे ७० वर्षांत झाले नाही, ते पाच वर्षांत व्हावे, ही अवाजवी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले. गेल्या ७० वर्षांत शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला असता, तर आज देशाचे चित्र वेगळे असते, असा टोलाही त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता लगावला.

नरेंद्र मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळातील विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मुंडे बोलत होत्या. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले या वेळी उपस्थित होते.

मुंडे म्हणाल्या,की एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे विद्यमान पंतप्रधानांचा संपूर्ण देशभरात वावर आहे. मोदींमुळे परदेशात भारताचा सन्मान वाढला आहे. गेल्या चार वर्षांतील विकासकामे, योजनांची माहिती आम्ही आकडेवारीसह देत आहोत. देश महासत्तेकडे जाताना एक चांगला राज्यकर्ता मोदींच्या रुपाने देशाला मिळाला आहे.

जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकारची वाटचाल

जनधन योजना, स्वच्छता अभियान, प्रधानमंत्री विमा व जीवन ज्योती विमा योजना, वयबंधन योजना राबवल्या जात असून नैसर्गिक आपत्तीत ५० टक्के नुकसान झाल्यानंतर देण्यात येणारी नुकसानभरपाई ३३ टक्क्यांवर आणण्यात आली आहे. कृषी कर्जाची रक्कम ११ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. आयुष्मान भारत आरोग्य योजना राबवली जात असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महू या जन्मगावी संग्रहालय उभारण्यात येत आहे. त्यांचे लंडन येथील घरही सरकारने विकत घेतले आहे. दिव्यांग नागरिक, शिक्षण, स्वयंरोजगार, खेलो इंडिया आणि मुद्रा अशा विविध योजनांमधून कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च झाला असून तेवढेच लाभार्थी आहेत, असे सांगत मुंडे यांनी जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकारची वाटचाल सुरू आहे, असा दावा केला.

महिलांसाठी विशेष योजना राबवल्या

प्रसूती रजा तीनवरुन सहा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली असून उज्ज्वला योजनेतून गॅस जोडण्या दिल्या आहेत. ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ योजनेतून देशातील १०४ जिल्ह्य़ांमध्ये मुलींचा जन्मदर वाढला आहे. बारा वर्षांखालील मुलींवर अत्याचार झाल्यास फाशी, तर सोळा वर्षांखालील मुलींवर अत्याचार करणाऱ्यांची शिक्षा दहा वरुन वीस वर्षांची केली आहे. तिहेरी तलाक बंद केला असून हजला जाताना पुरूष बरोबर असण्याची अट शिथिल करण्यात आली आहे, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.