ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भूमिका

भाजप-शिवसेना युतीला खूप वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा पुढे अशीच चालू राहावी अशी आमची भावना आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी, ही प्रत्येक भाजप नेत्याची भावना आहे, असा दावा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. प्रादेशिक पक्ष दूर जात असल्याचे चित्र आता दिसत असले, तरी ते खरे नाही आणि आगामी काळात हे चित्र बदलण्याची क्षमता आमच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंडे म्हणाल्या, भाजपपासून प्रादेशिक पक्ष दूर जात असल्याचे चित्र रंगवले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील.  भाजप-शिवसेना यांनी एकत्र लढावे अशी भाजपच्या प्रत्येक नेत्यांची भूमिका असून शिवसेना जरूर आमच्या बरोबर येईल.

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सहानुभूती दाखवली आहे, त्याबाबत बोलताना मुंडे म्हणाल्या, भुजबळ यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांची विचारपूस केली असल्यास त्यात गैर काहीच नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणे चुकीचे आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून मुख्यमंत्री फडणवीस यांची ध्वनिफीतीत प्रसारित केलेल्या मुद्दय़ावर कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी सल्ला देणे, यामध्ये गैर काही नाही, असे त्यांनी सांगितले.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती अस्वस्थ करणाऱ्या पेट्रोलच्या किमती वाढल्यानंतर विरोधक असताना जी अस्वस्थता होती, तीच आज सत्ताधारी असतानाही जाणवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत गंभीर आहेत. राज्याने सर्व कर कमी केल्यास राज्य शासनाचे उत्पन्न कमी होईल. त्यामुळे पेट्रोलच्या किमती कमी करण्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेऊ. महामार्गावरील मद्यबंदी आणि दुष्काळावेळी लावलेला पेट्रोलवरील अधिभार कमी करून राज्य शासनाचे उत्पन्न कमी करण्यापेक्षा केंद्र शासनासोबत चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेऊ, असेही मुंडे यांनी सांगितले.