निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धंनजय मुंडे यांनी पिंपरी-चिंचवड येथे भाष्य केले. पवित्र अशा गहिनीनाथ गडावरुन मला शुभेच्छा देण्याची त्यांना सदबुद्धी मिळाली याचा आनंद आहे, अशा खोचक शब्दांत त्यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला.

मराठवाड्यातील लाखो नागरिक कामा-धंद्यानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास असून इथेच स्थायिक झाले आहेत. या मराठवाड्यातील नागरिकांसाठी धंनजय मुंडे यांच्या आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड येथील रावेत येथे आयोजित करण्यात आला होता. या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.

मुंडे म्हणाले, “विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या विरोधी उमेदवार पंकजा मुंडे यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत. आजपर्यंत मला त्यांच्या शुभेच्छा मिळाल्या नव्हत्या. काल ही त्या मला ऐकायला मिळाल्या नाहीत. पण मी माध्यमांकडून सोशल मीडियाकडून जे काही ऐकलं पाहिलं त्यातून त्यांनी शुभेच्छा दिल्याचं कळंल.”

“त्यांनी मला मनापासून शुभेच्छा दिल्याचा आनंद आहे. उशिरा का होईना, वामनभाऊ यांचे वास्तव्य आणि त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या गहिनीनाथ गडावरती त्यांना मला शुभेच्छा देण्याची सद्बुद्धी मिळाली. मला या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे. त्यांच्या शुभेच्छा मला सर्वसामान्य माणसांच्या सेवा करण्यासाठी प्रेरणा देत राहतील. या शुभेच्छा मी आनंदाने स्वीकारल्या आहेत. त्यासाठी मी पंकजा मुंडेंचे धन्यवाद देखील मानले आहेत,” असेही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.