रेणूंच्या हालचाली, त्यांच्या परस्पर क्रिया यांच्या अभ्यासासाठी आता सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कॉम्युटिंग (सीडॅक) मदत करणार असून बायोइन्फर्मेटिक्समधील अद्ययावत संशोधनासाठी सीडॅकने ‘परम बायोब्लेझ’ हा सुपरकॉम्प्युटर तयार केला आहे. या प्रणालीचे अनावरण मंगळवारी करण्यात येणार आहे, असे सीडॅकचे कार्यकारी संचालक हेमंत दरबारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
सीडॅकचे बायोइन्फर्मेटिक्स केंद्र गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे. बायोइन्फर्मेटिक्स विषयातील अद्ययावत संशोधनासाठी सीडॅकतर्फे ‘परम बायोब्लेझ’ हा नवा सुपर कॉम्प्युटर तयार करण्यात आला आहे. या नव्या प्रणालीमध्ये माहिती साठवून ठेवण्याची क्षमता आतापर्यंतच्या प्रणालींपेक्षा जास्त आहे. या प्रणालीच्या माध्यमातून माणसाच्या पेशी आणि त्यांच्या कार्याचा अभ्यास अधिक बारकाव्याने करता येणार आहे. रेणूंच्या हालचाली, त्यांच्या परस्पर क्रिया यांच्या अभ्यासासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे.
सीडॅकच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अक्सलरेटिंग बायोलॉजी-कॉम्प्युटिंग लाईफ’ या विषयावरील तीन दिवसीय परिषदेमध्ये या प्रणालीचे अनावरण करण्यात येणार आहे.  हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू रामक्रिष्णा रामस्वामी यांच्या उपस्थितीत मंगळवारी या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.