“अब तो ये स्पष्ट है, ठाकरे सरकार भ्रष्ट है”, “राजीनामा द्या, राजीनामा द्या, ठाकरे सरकार राजीनामा द्या”, अशा घोषणा देत भाजपाच्या वतीने आज पुण्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं. आंदोलनावेळी यावेळी प्रतिकात्मक नोटा देखील उधळत अनिल देशमुख यांच्या फोटोला जोडे मारून भाजपाने निषेध नोंदवला.

“गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी देखील केली आहे. त्यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो, असं चंद्रकांत पाटील आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना म्हणाले. “त्यांना हात जोडून विनंती करतो की, आम्हाला बळ देऊ नका. अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी लढा देऊया. आमच्या खांद्याची तुम्हाला अस्पृश्यता जरी असेल, तरी सर्वांनी स्वतंत्रपणे रस्त्यावर उतरून लढा दिला पाहिजे. अंजली दमानिया यांच्यासह सर्वांना आवाहन आहे… तुम्ही कुठे आहात? शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, विद्या चव्हाण या महिलांवरील अन्याय अत्याचाराबद्दल आवाज उठवतात. त्या कुठे आहेत?,” असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला.

वर्षभरातील ठाकरे सरकारचा कारभार हा हाताबाहेर गेला असून, आता ठाकरे सरकारचा राजीनामा झाला पाहिजे, अशी मागणी आम्ही राज्यपाल यांच्याकडे करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. “ठाकरे सरकार हे पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतलेलं आहे. ठाकरे सरकारने कितीही साळसूदपणाचा आव आणला तरीही आता ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचा खुलेआम पर्दाफाश झाला आहे. आता केवळ अनिल देशमुख यांनी राजीनामा न देता संपूर्ण ठाकरे सरकारने पायउतार व्हावे. अनिल देशमुख यांची १०० कोटींची गोष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार सर्वांना ठाऊक होती, परंतु सर्व गप्प होते,” असंही पाटील यांनी म्हटलं आहे.