जुन्या पिढीतील उद्यानतज्ज्ञ म. का. राजवाडे ( वय ९४) यांचे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील टाउन हॉल कमिटी, डेक्कन क्लब हिराबाग या जुन्या संस्थांमध्ये मानद सचिव, अध्यक्ष अशा पदांवर राजवाडे यांनी काम केले होते. अनेक
कारखाने, पंचतारांकित हॉटेल्स, प्रतिष्ठित संस्था, उद्योगांमधील बगिचे विकसित करण्याचे श्रेय राजवाडे यांना जाते.
राजवाडे यांचा जन्म काकती (बेळगाव) येथे झाला आणि प्राथमिक शिक्षण सांगली येथे झाले. मृदसंधारण या विषयात पदविका घेतल्यानंतर १९४८ मध्ये त्यांनी तेव्हाच्या मुंबई सरकारमध्ये कामाला सुरुवात केली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी- एनडीए) संपूर्ण बगिचे व वृक्षलागवडीचे काम त्यांनी १५० ते ५८ या काळात केले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राजवाडे यांची नियुक्ती सिंहगड परिसराचे सुशोभीकरण व इतर काही प्रकल्पांसाठी झाली. पुढे १९६५ मध्ये सरकारी नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली. त्या काळातील ज्ञानवृद्ध उद्यानतज्ज्ञ भा. वि. भागवत यांचे मार्गदर्शन त्यांना तेव्हा लाभले. पंचेचाळीस वर्षांच्या कारकिर्दीत राजवाडे यांनी अनेक संस्था, उद्योगांमधील बगिचे विकसित केले तसेच वृक्षलागवड करून परिसर हिरवे केले. विविध संस्थांमध्येही त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केले होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.