मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याचे कारण

पुणे : महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या वाहनतळांबाबत सातत्याने तक्रारी येत असल्यामुळे आणि ठेकेदाराकडे मोठय़ा प्रमाणावर थकबाकी असल्यामुळे वाहनतळ स्वत:च चालविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यामुळे अखेर वाहनतळ निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदारांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून वाहनतळ पुन्हा ठेकेदारांच्या हाती जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांसाठी महापालिकेने वाहनतळ बांधले आहेत. ते ठेकेदारांना चालविण्यासाठी देण्यात आले आहेत. मात्र महापालिकेने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारणे, पावती न देणे, वाहनचालकांशी हुज्जत घालणे, वाहनतळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून न देणे असे प्रकार सातत्याने होतात. त्यातच काही ठेकेदारांनी महापालिकेला देय असलेली रक्कमही दिलेली नाही. नागरिकांकडून पुराव्यासह दाखल होत असलेल्या तक्रारी आणि थकबाकीची वाढती रक्कम यामुळे काही वाहनतळांना महापालिकेने ताळे ठोकले होते. हे वाहनतळ स्वत: चालविण्याचा निर्णय महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून घेण्यात आला होता.

वाहनतळ चालविण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असा प्रस्ताव मालमत्ता व्यवस्थापन विभागाने सामान्य प्रशासन विभागाला दिला होता. महापालिकेकडून वाहनतळांचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. मात्र महापालिकेकडे कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण सामान्य प्रशासन विभागाकडून पुढे करण्यात आले आहे. सध्या काही वाहनतळ आहेत ते कर्मचाऱ्यांच्या मदतीने महापालिका स्वत: चालवित आहेत. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाहनतळाचे नियंत्रण करणेही अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे आता निविदा प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू झाली आहे.

मंडईतील वाहनतळासाठी निविदा

महात्मा फुले मंडई परिसरातील हुतात्मा बागू गेनू (आर्यन) येथील वाहनतळ तीन वर्षे कालावधीसाठी कराराने देण्याचा प्रस्ताव सध्या महापालिका मुख्य सभेच्या कार्यपत्रिकेवर आहे. त्यासाठी फेरनिविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मुख्य सभेकडून हा प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता आहे. सध्या याच परिसरातील कै. सतीश मिसाळ पार्किंग तुटपुंज्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने महापालिका चालवित आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे ते चालविणेही काहीसे अडचणीचे ठरत आहे.

वाहनतळांबाबत तक्रारी

वाहनतळ ठेकेदारांना चालविण्यास देण्यात आल्यानंतर वाहनचालकांना पायाभूत सुविधा दिल्या जात नसल्याचे आढळून आले होते. पिण्यासाठी पाणी, स्वच्छतागृह या सुविधांची वानवा होती. वाहनतळाच्या परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याचेही दिसून आले होते. तसेच काही वाहनतळातील ठेकेदारांकडून करारापेक्षा जास्त शुल्क आकारणी  होत होती. तशा तक्रारीही प्रशासनाकडे आल्या होत्या.

साडेतीन कोटींची थकबाकी

शहरात महापालिकेच्या मालकीचे २६ वाहनतळ आहेत. ते सर्व यापूर्वी निविदा काढून चालविण्यास देण्यात आले होते. त्यातील काहींचे करार अद्याप संपलेले नाहीत. तर काहींचे करार संपले आहेत. यातील काही ठेकेदारांकडून महापालिकेला देय असलेली रक्कम थकविण्यात आली आहे. ही रक्कम साडेतीन कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे थकबाकी असलेल्या वाहनतळधारकांना महापालिकेने नोटिसा बजाविल्यात आहेत. तर काही वाहनतळांना ताळे ठोकले असून ते ताब्यात घेतले आहेत.