महापालिकेच्या वाहनतळांवर ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा वाहनचालकांकडून जादा दराने पैसे घेऊन लूट केली जात आहे. त्यामुळे जादा दराने पैसे घेणाऱ्या ठेकेदारांवर त्वरित कारवाई करावी आणि त्यांचा ठेका रद्द करावा, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
महापालिकेने उद्याने, बागा, नाटय़गृह तसेच अनेक सार्वजनिक ठिकाणी वाहनतळ विकसित केले असून ते चालवण्यासाठी ठेकेदारांना दिले आहेत. दुचाकी तसेच चार चाकी वाहनचालकांकडून या वाहनतळांवर किती शुल्क घ्यावे याचे दरही ठेका देतानाच निश्चित करून देण्यात येत असले, तरी ठरवून दिलेल्या दरापेक्षा बहुतेक ठिकाणी जादा दराने पार्किंग शुल्काची आकारणी होत असल्याच्या तक्रारी आहेत. नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी या संबंधीची तक्रार गुरुवारी महापालिका आयुक्तांकडे केली.
पैसे वसूल करण्यासाठी ठेकेदारांनी नेमलेले कर्मचारी वाहनतळांवर नागरिकांशी उद्धटपणे वागतात, पार्किंगसाठी जादा पैसे आकारतात आणि त्यांच्या वर्तनाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. महापालिकेने शहरातील प्रत्येक वाहनतळावर शुल्क आकारणीच्या दराबाबत ठळकपणे फलक लावावेत तसेच संबंधित महापालिका अधिकाऱ्यांचे दूरध्वनीही या फलकावर द्यावेत, अशी मागणी नागपुरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. फलकावर दर लिहिल्यामुळे नागरिकांची लूट थांबेल, असे नागपुरे यांनी निवेदनात म्हटले असून जे दोषी ठेकेदार आहेत त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांचा वाहनतळाचा ठेका त्वरित रद्द करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.