श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

विविध शारीरिक आणि मानसिक आजार उद्भवले की, त्या घरात एक चिंतेचे आणि निराशेचे वातावरण निर्माण होते. ही चिंता आणि नैराश्य दूर करण्यास मदत करण्याचे कार्य करतात ते ‘सपोर्ट ग्रुप’ म्हणजेच स्वमदत गट. मज्जासंस्थेशी संबंधित असणारा पार्किन्सन्स हा आजार. या आजाराने ग्रस्त झालेल्या रुग्णाला तसेच त्याच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा उद्देशाने स्थापन झालेल्या पार्किन्सन मित्र मंडळाने नि:स्वार्थपणे आपले सेवाकार्य सुरू ठेवले आहे.

दोन समदु:खी, समविचारी, ध्येयवादी एकत्र आले की काय घडू शकते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘पार्किन्सन मित्र मंडळ’. शरच्चंद्र पटवर्धन आणि कै. मधुसूदन शेंडे यांनी २२ ऑक्टोबर २००० रोजी या मित्र मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. पटवर्धन यांच्या पत्नीला १९९२ मध्ये पार्किन्सन झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांनी औषधोपचार तर लगेचच सुरू केले. पण पार्किन्सन झालेल्या रुग्णांना मानसिक आधार देणारी कोणतीही यंत्रणा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी त्या दृष्टीने विचार करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांची भेट मधुसूदन शेंडे यांच्याशी झाली होती. त्यांनी पटवर्धन यांना परदेशातील स्वमदत गटांविषयीच्या माहिती देत असतानाच, असा एखादा गट पुण्यातही हवा अशी भावना व्यक्त केली. शेंडे हे स्वत: पार्किन्सनग्रस्त होते. शेंडे यांच्या सामाजिक आवाहनाला प्रतिसाद देत पटवर्धन यांनी या आजाराला धैर्याने तोंड देण्याचे ठरवले. शेंडे यांनी परदेशात अनेक ठिकाणी प्रवास आणि निवासही केला होता. त्यामुळे या संदर्भातील पत्रकं, पुस्तकं, ध्वनिफिती अशा विविध माध्यमांतून त्यांनी मोठय़ा प्रमाणात माहिती संकलित केलेली होती. पुण्यातील पार्किन्सन झालेल्या रुग्णांना एकत्र आणून या आजाराबाबत माहिती देण्याचे या द्वयींनी ठरविले.

पार्किन्सनच काय पण कोणताही आजार झाला, की रुग्णाबरोबरच त्यांचे कुटुंब नकळतपणे चिंताक्रांत होते. विविध प्रकारच्या चिंतांना संपूर्ण कुटुंबालाच सामोरे जावे लागते. आजाराबाबत मिळालेल्या माहितीने या चिंताग्रस्त रुग्णाची चिंता कमी करण्याबरोबरच मानसिक आणि भावनिक आधार देण्याचे महत्त्वाचे कार्य करावे लागते. हे कार्य पार्किन्सन झालेल्या रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी पार्किन्सन मित्र मंडळ अव्याहतपणे करीत आहे. रुग्णाला, कुटुंबीयांना येणारा ताण दूर करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी हे मित्र मंडळ करीत आहे. या कुटुंबीयांचा ढासळलेला आत्मविश्वास पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतानाच पार्किन्सन मित्र मंडळाकडे येणाऱ्या रुग्णांची म्हणजेच शुभार्थीची संख्या वाढू लागली. शुभार्थीला बसणारा मानसिक धक्का, आर्थिक विवंचना, सामाजिक-कौटुंबिक मर्यादा यांच्याशी शुभंकराला (केअर ग्रीव्हरला) मोठय़ा प्रमाणात सामना करावा लागतो. हा सामना पटवर्धन आणि शेंडे यांनी केलेला असल्यामुळे या मित्रमंडळाची धुरा सांभाळण्याचे त्यांनी ठरवले. या स्वमदत गटाचे ध्येय वाक्य ठरले ‘मदत घ्या, मदत करा, पार्किन्सनसह आनंदात जगू या’. या वाक्याला अनुसरून मंडळाने आपल्या कार्याला जोमाने सुरुवात केली.

ध्येय वाक्याप्रमाणेच पार्किन्सनसह जीवन जगणारे शुभार्थी आणि शुभंकर यांच्या आयुष्याची गुणवत्ता वाढवणे हेच पार्किन्सन मित्र मंडळाचे प्रमुख ध्येय ठरले. हे ध्येय साध्य करण्यासाठी शुभार्थी आणि शुभंकर यांचे आजाराबद्दलचे ज्ञान वाढविणे हेही मंडळाने महत्त्वाचे ध्येय मानले. यासाठी मित्र मंडळ विविध उपक्रमांचे नियोजन करते. पटवर्धन आणि शेंडे यांनी सुरू केलेले हे कार्य गरजूंपर्यंत पोहोचावे म्हणून रा. ह. करमरकर कार्यरत असून मित्र मंडळाचे स्वत:चे कार्यालय नसल्यामुळे आपल्या सदाशिव पेठेतील निवासस्थानातून कार्यरत आहेत. मित्र मंडळाची स्थापना झाल्यापासून ते आतापर्यंत पार्किन्सनसंबंधी नवनवीन औषधोपचार तसेच वैद्यकीय तंत्रज्ञानातही बदल झाले आहेत. यासंबंधाची माहिती देण्याबरोबरच, माहितीची, अनुभवांची देवाण-घेवाण करणे हाच हेतू मंडळाच्या कार्यकारिणीने ठेवलेला आहे. शुभार्थीचे हित पाहणे, शुभार्थी आणि शुभंकराचे मानसिक स्वास्थ खचू न देणे, शुभार्थीचे शारीरिक-मानसिक-भावनिक-सामाजिक आरोग्य सुधारणे, शुभार्थी आणि शुभंकर यांच्यातील आत्मविश्वास आणि मनोधैर्य वाढविणे, आशावादी दृष्टिकोन वाढविणे अशा प्रकारचे कार्य या मंडळाकडून केले जाते. या मंडळाच्या कार्याची जर कोणाला गरज असेल किंवा या मंडळाच्या कार्यात सहभागी व्हायचे असेल तर ९४२३३३८१६४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. मित्र मंडळातर्फे शुभार्थीच्या शारीरिक क्षमतेचा अंदाज घेऊन सहलींचे आयोजनही करण्यात येते. अधिक लांब सहलीचे आयोजन न करता पुण्याच्या आसपासच्या परिसरात सहलींचे आयोजन केले जाते. सहलींमध्ये खेळ, गाणी, विनोद, ओरिगामी, मनोरंजनाचे कार्यक्रम, छोटय़ा स्पर्धा घेतल्या जातात. याशिवाय पार्किन्सनग्रस्तांसाठी ‘चला संवाद करू या’, ‘पार्किन्सनग्रस्तांसाठी मौलिक सूचना’, ‘पार्किन्सनशी मैत्रीपूर्ण लढत’ अशी पुस्तके मराठीतून अनुवादित करण्यात आली आहेत.  मंडळाला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मंडळाच्या विविध सभांचा अहवाल शुभार्थी आणि शुभंकर यांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी तिमाही संवादपत्र प्रकाशित करण्यात येते. शरच्चंद्र पटवर्धन आणि डॉ. शोभना तीर्थळे हे या संवादपत्राच्या कार्यातून सभासदांपर्यंत मंडळाचे कार्य पोहोचवतात.