मतदारसंघातील महत्त्वाचे नेते, नागरिकांच्या गाठीभेटी

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मावळ येथे पार्थ  पवार यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाली नसतानाच त्यांनी धडाक्यात प्रचार आणि मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

अध्यक्ष शरद पवार यांनी माढय़ाच्या आखाडय़ातून माघार घेतली. त्या वेळी पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी मिळेल, असे संकेत होते. प्रत्यक्षात उमेदवारांच्या पहिल्या यादीत पार्थचे नसल्याने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला.  तरीही निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने मतदारसंघातील प्रमुखांच्या भेटीगाठी घेण्यास पार्थ यांनी सुरुवात केली आहे.

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत मावळात राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यंदाही सक्षम उमेदवार राष्ट्रवादीकडे नव्हता. अजित पवारांना मावळच्या राजकारणाची खडा न् खडा माहिती आहे. सद्य:स्थितीत पिंपरीत भाजप-शिवसेना नेत्यांतील सुंदोपसुंदीचा राजकीय लाभ घेण्याची व्यूहरचना त्यांनी यापूर्वीच केली होती. पवार कुटुंबातील गृहकलहाची पाश्र्वभूमीही होतीच. त्यादृष्टीने मुलगा पार्थला यंदाच राजकारणात उतरवण्याचे त्यांचे मनसुबे होते. त्याचाच एक भाग म्हणून पार्थला मावळ लोकसभेत उतरवण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे पक्षवर्तुळातून सांगितले जाते.

मावळ पट्टय़ात स्वतंत्र ताकद असणाऱ्या शेकापशी राष्ट्रवादीची आघाडी झाली. दिवाळीपासून पार्थ संभाव्य उमेदवार असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. महत्त्वाच्या नागरिकांच्या गाठीभेटी पार्थ यांनी खूप आधीपासूनच सुरू केल्या होत्या. सुरूवातीला गोपनीयता पाळण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धासाठी पार्थने हजेरी लावली, तेथून उमेदवारीविषयी उघड चर्चा सुरू झाली.

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांनी पार्थची भेट घेतल्याच्या छायाचित्राने खळबळ उडाली होती. सांगवीत नवनाथ जगताप यांच्या संस्थेच्या साईबाबांच्या महाआरती कार्यक्रमास पार्थ उपस्थित राहिले.  याच पट्टय़ातील नाना काटे, अतुल शितोळे, श्याम जगताप, अमरसिंह आदियाल, तानाजी जवळकर या पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांनी स्नेहभोजन घेतले. प्रशांत शितोळे, राजू जगताप, कैलास थोपटे, हनुमंत गावडे, मोरेश्वर भोंडवे, गणेश भोंडवे आदींसह मावळ विधानसभेतील सर्व प्रमुखांच्या त्यांनी घरी जाऊन गाठीभेठी घेतल्या. मध्यंतरी, शरद पवार यांनी पार्थ लोकसभा लढवणार नाही, अशी घोषणा केली. तेव्हा पिंपरी-चिंचवडच्या गाठीभेठी त्यांनी थांबवल्या. मात्र, शेकापनेत्यांच्या भेटीगाठी सुरूच होत्या, असे सांगण्यात येते. शरद पवारांनी सोमवारी पुण्यात पार्थच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतर, पार्थ यांनी पुन्हा जोमाने तयारीला सुरूवात केली आहे.