मुठा उजवा कालवा फुटल्यानंतर आसपासची घरे आणि झोपडपट्टय़ांमध्ये काही क्षणातच पाणी शिरले आणि भीतीपोटी नागरिकांनी एकच टाहो फोडला.  आता आम्ही काय करायचे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. आक्रोश, आरडाओरड, अग्निशमन दलाच्या गाडय़ांवरील धोक्याची सूचना देणारे भोंगे अशा गोंधळाच्या वातावरणात मदतकार्य सुरू झाले. अग्निशनम दलाचे जवान, पोलिसांच्या मदतकार्याला स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले. संध्याकाळी हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. दरम्यान, पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

दांडेकर पुलाशेजारील मुठा उजवा कालवा गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कालव्याची भिंत खचून कालवा फुटला. कालव्यातील पाणी प्रचंड वेगाने दांडेकर पूल, जनता वसाहत आणि दत्तवाडी परिसरात घुसले. त्यामुळे शेकडो संसार रस्त्यावर आले. पाण्याच्या प्रवाहामुळे कुठे घरांच्या भिंतीना तडे गेले तर काही झोपडय़ाही उद्ध्वस्त झाल्या. यात गृहोपयोगी साहित्य, गाडय़ा जलप्रवाहात डोळ्यादेखत वाहून गेल्या. सकाळी नेहमीप्रमाणे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सुरू असतानाच ही बातमी वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण शहरात पसरली आणि या परिसरात बघ्यांची एकच गर्दी उसळली. पण जलप्रलयाचा फटका बसलेल्या नागरिकांकडूनच एकच टाहो फोडण्यात आला. संसार उद्ध्वस्त झाल्याचे पाहतानाच कोणी हंबरडा फोडला तर कोणी आक्रोश केला. स्थानिक नागरिक, पोलीस आणि, स्वयंसेवकांनी नागरिकांना मदतीचा हात दिला. परिसराला जलप्रलयाचा फटका बसल्याचे समजताच मदतकार्यही तातडीने सुरू झाले. सुरक्षिततेच्या कारणासाठी रस्ते बंद करण्यात आले. अग्निशमन दल, पोलीस, महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मदत कार्य सुरू झाले. त्याला स्थानिक नागरिकांनीही साथ दिली. दोरखंड लावून घरात, झोपडपट्टय़ात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यास सुरुवात झाली. स्वयंसेवकांनी महिला, लहान मुलांना पाठीवरून सुरक्षित स्थळी हलविले. वाहतुकीचे नियोजनही काही नागरिकांकडून करण्यात आले. महापालिकेच्या शाळांमध्ये स्थानिक परिसरातील रहिवाशांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले. विविध स्वयंसेवी संस्थांनीही बाधितांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेत मदत कार्यात सहभाग नोंदविला.

नागरिकही जबाबदार

कालव्यालगतच्या परसरात नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणे केली आहेत. ही अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी महापलिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात येते. मात्र कारवाई करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होतो. कारवाई करण्यास गेलेल्या पथकाकडून महिलांना पुढे करण्यात येते. त्यामुळे कारवाईलाही अडथळा निर्माण होतो.

शाळा, पाळणाघरे सुरू

सिंहगड रस्त्याचा भाग पाण्याखाली गेल्याचे वृत्त पसरताच शाळांना सुट्टी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे पालकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला तर पाळणाघरेही नियमित सुरू होती.

महापौरांना घेराव

घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी स्थानिक नगरसेवकांच्या साहाय्याने घटनास्थळाची पाहणी केली. त्या वेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी त्यांना घेराव घालत प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जाब विचारला. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संतप्त प्रश्नांनी महापौरही निरुत्तर झाल्या.

घरामध्ये पाणी शिरल्यामुळे गृहोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. घरीच बसून बिल बुक नंबर तयार करण्याचे काम करीत असून मुलगा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. पाण्यात पैसेही वाहून गेल्यामुळे आता आम्ही जगायचं कसा, मुलांचे शिक्षण कसे पूर्ण करायचं ?

– पल्लवी फडकले, गृहिणी

कालवा फुटल्याची बातमी कळाली आणि परिसरात एकच धावपळ उडाली. दुकानात कोणी नसल्यामुळे दुकानात थांबून राहिलो होतो. पाणी वाढू लागल्यानंतर मला दोरखंडाच्या साह्य़ाने बाहेर काढण्यात आले. हीच घटना रात्री घडली असती तर अनर्थ झाला असता.

– प्रभाकर मारणे, स्थानिक दुकानदार