मोर्चामध्ये सहभाग घेतल्यामुळे पोलिसांच्या अन्यायाचा सामना करण्याची वेळ

पुणे : अमेरिके तील जॉर्ज फ्लॉएड यांच्या हत्येविरुद्ध नागरिकांनी काढलेल्या निषेध मोर्चामध्ये पुणेकर तरुणी प्रिया सुमन अवस्थी हिने सहभाग घेतला आहे. के वळ सहभागच नव्हे तर या मोर्चामध्ये सहभाग घेतल्यामुळे तेथील पोलिसांच्या अन्यायाचा सामनाही तिला करावा लागला आहे. प्रिया सध्या भिन्नलिंगी (ट्रान्सजेंडर) युवकांच्या विविध हक्कांसाठी अमेरिके त कार्यरत आहे.

पुण्यातील ‘मासूम’ संस्थेचे संस्थापक आणि प्रियाचे आईवडील डॉ. मनीषा गुप्ते आणि डॉ. रमेश अवस्थी यांनी याबाबत ‘लोकसत्ता’ला माहिती दिली. डॉ. मनीषा गुप्ते म्हणाल्या, जॉर्ज फ्लॉएड यांच्या हत्येविरोधात निषेध नोंदवण्यासाठी एका १७ वर्षीय कृष्णवर्णीयाने के लेल्या आवाहनाला प्रतसिाद देत मोठय़ा संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. प्रिया सहभागी झाली त्यांपैकी सॅन फ्रान्सिस्को येथील निषेध शांततामय होता, मात्र, ऑकलँड येथील तिचा अनुभव चांगला नाही. या मोर्चामध्ये पोलिसांनी सहभागी नागरिकांच्या चेहऱ्यांवर मिरचीचे फवारे उडवले. त्यामुळे नागरिकांना वेदना झाल्या.

एका गौरवर्णीय पोलीस अधिकाऱ्याने कृष्णवर्णीय महिलेवर आपले वाहन रोखून ते वेगाने तिच्या दिशेने नेऊन तिला इजा करायचा प्रयत्न के ला, मात्र एका गौरवर्णीय महिलेनेच आपले वाहन त्याच्या मार्गात रोखल्यामुळे त्या कृष्णवर्णीय महिलेवर होणारा हल्ला टळला. प्रियाने हे स्वत: अनुभवले. हे तिचे अनुभव कथन करताना असा वर्णभेद दर्शवणारा उल्लेख करणे गैर वाटते, मात्र त्याला पर्याय नाही. प्रियासह पोलिसांच्या अन्यायाचा सामना के लेल्या अनेकांना रुग्णालयातील उपचारांनंतरही फारसा आराम पडलेला नाही, यावरून त्या अन्यायाच्या तीव्रतेची कल्पना येते, असेही डॉ. गुप्ते यांनी सांगितले.

दिलासादायक गोष्ट अशी, की शांततामय निषेध मोर्चावर पोलिसांनी हल्ला के ल्यानंतर काही गौरवर्णीय महिलांनीच पुढे येऊन इतर वर्णाच्या नागरिकांचे संरक्षण के ले. प्रिया तिथे एकटी असल्याने हा प्रकार पालक म्हणून आम्हाला चिंतेत टाकणारा आहे, मात्र त्याचवेळी आमच्या लेकीला अशा अन्यायाविरोधात उभे राहावेसे वाटते याचा आम्हाला अभिमानही आहे. जात, वर्ण, वंश असे भेद मानणारे दक्षिण आशियाई नागरिक आजही अशा निषेधापासून दूर आहेत, याबाबतची खंत प्रिया व्यक्त करते, असेही डॉ. गुप्ते यांनी सांगितले.