अमित शहांचा कार्यकर्त्यांना सल्ला
‘‘आमदार बनताच आपल्याला मंत्री का केले नाही, राज्यमंत्री बनताच आपल्याला कॅबिनेट मंत्री का केले नाही, अमुकच खाते का मिळाले नाही, असे लोक म्हणताना दिसतात. परंतु तुम्ही ज्यांच्या पुण्याईवर उभे आहात त्यांच्या जीवनात हा विचारच नव्हता. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे विसरता कामा नये. राजकारणात निवडणुका जिंकायला हव्यात, कार्यकर्ते सरकारमध्येही येतील. पण त्या ठिकाणी पोहोचणे हे आपले साध्य नसून साधन आहे,’’ अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.
पं. दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी व ‘एकात्म मानव दर्शन सुवर्ण महोत्सवा’च्या निमित्ताने ‘साप्ताहिक विवेक’तर्फे ‘राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय’ या ग्रंथाचे रविवारी शहा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, गोविंददेवगिरी महाराज, रमेश पतंगे, डॉ. राजेंद्र फडके, दिलीप करंबेळकर व पक्षाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
पं. दीनदयाळ उपाध्याय हे इतर देशात जन्मले असते तर जगाचे नेते झाले असते, असे शहा यांनी सांगितले. कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले,‘‘जनसंघाच्या स्थापनेसाठी दहा लोक जेव्हा जवाहरलाल नेहरु यांच्यासमोर बोलण्याची हिंमत घेऊन निघाले असतील तेव्हा त्यांच्या मनात सत्तेचा विचार आला असेल का?, मग त्या दृष्टीने विचार करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे?, कार्यकर्त्यांनी हे स्वत:च्या आत्म्याला विचारावे.
जेव्हा तुम्ही संघ व भाजपशी जोडले गेलात तेव्हा तुम्ही काय होतात व आता काय आहात याचा विचार करा.
या विचाराने तुम्हाला काय दिले हे तुमच्या लक्षात येईल. संघ व भाजप त्यातून वजा केले तर काहीच उरणार नाही.
मिळवण्यासाठीचा विचार सोडा, म्हणजे जे हवे ते आपोआप मिळेल. सरकार बनवणे हे साध्य नसून साधन आहे.
भारतमातेला वैभवाच्या शिखरावर नेणे हे लक्ष्य आहे. दीनदयाळ उपाध्याय यांच्या शताब्दीनिमित्त ‘मी स्वत:चा नव्हे, तर पक्ष व देशाचा विचार करीन,’ असे कार्यकर्त्यांनी ठरवले तर अनेक समस्या आपोआप सुटतील.’’