पुणेकरांना पाणीबचतीसाठी नव्या वर्षांची प्रतीक्षा

पुणे : पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर पर्वती ते लष्कर जलकेंद्रादरम्यानच्या बंदजलवाहिनीवर प्रतिदिन १५० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी बचतीची भिस्त असल्यामुळे पंधरा नोव्हेंबपर्यंत बंद जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचा महापालिका आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा दावा फोल ठरला आहे. बंदजलवाहिनीचे काम अद्यापही सुरू असून ते अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नोव्हेंबरअखेपर्यंत हे काम पूर्ण होणार असून जलवाहिनीची चाचणी घेण्यात येणार आहे. दोष आढळल्यास ते दूर करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रतिदिन १५० दशलक्ष लीटर पाणीबचत करण्यास नव्या वर्षांचा मुहूर्त मिळणार आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून यापूर्वी खडकवासला धरणाच्या कालव्यातून पर्वती आणि लष्कर जलकेंद्रासाठी पाणी घेण्यात येत होते. मात्र कालव्यातून सातत्याने पाण्याची गळती होत असल्यामुळे खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्र या दरम्यान बंद जलवाहिनी टाकण्यात आली. सध्या धरण ते पर्वती या दरम्यान बंद जलवाहिनीतून पाणी घेण्यात येत असून जलवाहिनीत आलेले पाणी पुढे पर्वतीपासून लष्कर जलकेंद्रासाठी पुन्हा कालव्यात सोडले जात आहे. लष्कर जलकेंद्रासाठी कालव्यातून पाणी सोडताना प्रतिदिन १५० दशलक्ष लीटर पाण्याची गळती होत होती. त्यामुळे पर्वती ते लष्कर जलकेंद्रा दरम्यान कालव्याच्या बाजून २२०० मिलीमीटर व्यासाची पोलादी जलवाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून हे काम सुरूच आहे.

खडकवासला धरणाचा मुठा उजवा कालवा फुटीनंतर कालवा समितीच्या बैठकीत हे काम पंधरा नोव्हेंबपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले. धरणातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा घटल्यामुळे महापालिकेला प्रतिदिन ११५० दशलक्ष पाणीसाठा मंजूर करण्यात आला. त्यानुसा पाणीपुरवठय़ाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करताना पर्वती ते लष्कर जलकेंद्राअंतर्गत बंद जलवाहिनीचे काम पंधरा नोव्हेंबपर्यंत पूर्ण होईल, असा दावा पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त सौरभ राव यांनी केला होता. बंद जलवाहिनीतून प्रतिदिन १५० दशलक्ष लीटर पाण्याची बचत होईल.

त्यामुळे जलसंपदाकडून मिळणारे प्रतिदिन ११५० दशलक्ष लीटर पाणी आणि बचतीमधून मिळणारे १५० दशलक्ष लीटर पाणी असे एकूण प्रतिदिन १३०० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होईल, असा हिशोबही महापालिकेकडून सादर करण्यात आला. मात्र आता हे काम मुदतीमध्ये पूर्ण होऊ न शकले नसल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे.

दरम्यान, प्रत्यक्ष जागेवर ६ हजार २१४ मीटर लांबीपैकी ६ हजार १०५ मीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. कालव्यालगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणीउपसा करावा लागत आहे. तसेच गोळीबार मैदान ते लष्कर जलकेंद्रापर्यंत सोलापूर रस्त्याच्या बाजूने जलवाहिनी टाकण्यात येत आहे. त्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पोलिसांच्या वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी लागत आहे. सोलापूर रस्ता वर्दळीचा असल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे कामाची गती राखण्यास अडथळे येत आहेत, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला.

जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात चाचणी घेण्यात येणार आहे. कामात काही दोष आढळल्यास महिनाभरात ते काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात प्रतिदिन १५० दशलक्ष लीटर पाणी बचतीसाठी नव्या वर्षांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कामातील अडथळे

सोलापूर रस्ता ओलांडण्यासाठी जॅकपूश पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. या ठिकाणी कठीण खडक असल्यामुळे स्पिल्टर आणि ब्रेकर वापरून खडक फोडण्याचे काम करण्यात येत होते. मात्र खडक कठीण असल्यामुळे दिवसाला जेमतेम दोन ते तीन इंच एवढेच काम होत आहे. त्यामुळे कंट्रोल ब्लास्टिंगद्वारे खडक फोडावा लागणार आहे. त्यासाठी पोलीस आयुक्तांची मान्यता लागणार आहे. या ठिकाणी ६० मीटर लांबीचा बोगदा प्रस्तावित असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. हे सर्व काम नोव्हेंबर अखेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

तीन वर्षे काम सुरूच

पर्वती जलकेंद्र ते धोबी घाटापर्यंत कालव्याच्या बाजूने जमिनीखालून बंद जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. एकूण ६ हजार २१४ मीटर लांबीच्या कामासाठी ११७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोया अ‍ॅण्ड कंपनीला हे काम करण्याचे कार्यआदेश १९ ऑक्टोबर २०१५ रोजी देण्यात आले. मात्र तीन वर्षांपासून हे काम सुरूच आहे.