दर कमी करण्याबरोबरच विविध मागण्यांसाठी आग्रही

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) गाडय़ांमधील बंद असलेल्या आयटीएमएस यंत्रणेबाबत पीएमपीच्या प्रवाशांकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. पीएमपी प्रशासनाने मासिक पासचे दर कमी करावेत, बसच्या मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवावी, प्रवाशांच्या सोयीसाठी डबलडेकर बस सुरू करावी, प्रवाशांच्या तक्रार निवारणासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्याही करण्यात आल्या.

सजग नागरिक मंचप्रणीत पीएमपी प्रवासी मंचकडून ‘पीएमपी प्रवासी मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, सतीश चितळे, जुगल राठी यावेळी उपस्थित होते. प्रवाशांच्या मागण्यांची प्रशासनाकडून पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

पीएमपीकडून दैनंदिन पासचे दर ७० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचा ३०० रुपयांचा आर्थिक फायदा होत आहे. त्याचा परिणाम मासिक पासवर झाला असून मासिक पास काढण्याकडे प्रवाशांचा ओढा कमी झाल्याचे सांगून मासिक पासचे दर कमी करावेत, अशी मागणी विवेक वेलणकर यांनी केली. प्रवाशांच्या तक्रारींसाठी प्रशासनाने टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून द्यावा, असे सु. वा. फडके यांनी सांगितले. गाडय़ांमध्ये बसविण्यात आलेली आयटीएमएस (इंटलिजन्ट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टिम) यंत्रणा बंद अवस्थेत असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली.

पीएमपीला डेपोची कमतरता जाणवत आहे. यातच पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या नव्या बस कुठे उभारण्यात येणार असा सवाल सतीश चितळे यांनी केला, तर

बसमध्ये प्रथमोपचार पेटी द्यावी, डबलडेकर बस सुरू करावी, चालक-वाहकांना योगा आणि विपश्यना प्रशिक्षण द्यावे, अशा मागण्या समीर शास्त्री आणि रमेश सरदेसाई यांनी केल्या.