09 July 2020

News Flash

आर्थिक विवंचनेमुळे रिक्षाचालक बेजार

सुरक्षिततेच्या उपाययोजना करूनही प्रवाशांची रिक्षांकडे पाठ

(संग्रहित छायाचित्र)

सुरक्षिततेच्या उपाययोजना करूनही प्रवाशांची रिक्षांकडे पाठ

पिंपरी : उद्योगनगरीत रिक्षांना प्रवासीच मिळत नसल्याने चालक, मालकांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजना करूनही शहरवासियांनी रिक्षा प्रवासाकडे  पाठ फिरवली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेमुळे रिक्षाचालक बेजार झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे २५ हजार रिक्षाचालक आहेत. विस्तृत भौगोलिक परिसर  असल्याने शहर परिसरात रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत आणि ठरवून  घेतलेले भाडे परवडत नसल्याची प्रवाशांची जुनीच तक्रार आहे. टाळेबंदीमुळे तीन महिन्यांपासून रिक्षाव्यवसाय जवळजवळ बंदच होता. शासनाने सुरक्षित उपाययोजना करण्याच्या अटींवर रिक्षांना परवानगी दिली. त्यानंतर शहरभरातील रस्त्यांवर रिक्षा धावू लागल्या. आवश्यक उपाययोजना करूनही रिक्षांना प्रवासीच मिळत नाहीत, करोनाच्या भीतीने नागरिक रिक्षात बसण्यास घाबरतात, असा अनुभव रिक्षाचालकांना येऊ लागला.

शाळा, महाविद्यालये बंद आहेत. वृद्ध तसेच महिला घराबाहेर पडत नाहीत. उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. जिथून हक्काचे ग्राहक मिळत होते, अशी ठिकाणे बंदच आहेत. परिणामी, प्रवासी मिळत नाहीत. इंधन दरवाढीचा फटका बसतो आहेच. अशा परिस्थितीत रिक्षा चालवणे पर्यायाने घरखर्च भागवणे अवघड बनले असल्याची भावना रिक्षाचालकांकडून व्यक्त करण्यात येते.

तुम्ही फक्त लढ म्हणा..

एकीकडे अशी प्रतिकूल परिस्थिती असतानाही रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या चिखलीतील एका रिक्षाचालकाने जिद्दीने रिक्षाव्यवसाय करत कुटुंबाचा संपूर्ण भार उचलला आहे. नागेश काळे असे त्याचे नाव आहे. रिक्षा व्यवसायात अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, अनेक अडचणी भेडसावतात. दररोज कसेबसे दोनशे ते तीनशे रुपये मिळतात, असे सांगतानाच, सध्याच्या वाईट परिस्थितीत कोणीही खचून जाऊ नये, संकटावर मात करण्याचा निर्धार बाळगावा, असे आवाहन काळे यांनी केले आहे.

टाळेबंदीमुळे गेल्या १०० दिवसांत रिक्षा व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. आर्थिक विवंचनेमुळे रिक्षाचालकांचे जगणे अवघड झाले आहे. राज्यभरात ८ रिक्षाचालकांनी आत्महत्या केल्या आहेत. अलीकडेच रिक्षा सुरू झाल्या असल्या तरी, करोनाच्या भीतीपोटी नागरिक रिक्षाप्रवास टाळत आहेत. 

– बाबा कांबळे, अध्यक्ष, रिक्षा पंचायत, महाराष्ट्र

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत भीतीपोटी प्रवासी रिक्षातून प्रवास टाळताना दिसतात. दररोजचा व्यवसायच होत नसल्याने रिक्षाचालकांची आर्थिक स्थिती दयनीय म्हणता येईल, अशी झाली आहे.

– अनिल वायदंडे, रिक्षाचालक, कासारवाडी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 12:29 am

Web Title: passengers ignore rickshaws despite safety measures zws 70
Next Stories
1 Coronavirus Outbreak : स्थलांतरामुळे संक्रमण
2 पश्चिम महाराष्ट्रातील साखर- गुळाचा रेल्वेला गोडवा
3 ‘नॅड सेल’ स्थापन करण्याचे यूजीसीकडून विद्यापीठांना निर्देश
Just Now!
X