प्रादेशिक पारपत्र कार्यालयातर्फे २७ डिसेंबरला (शनिवार) मुंढव्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात ‘पासपोर्ट मेळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. सामान्य (नॉर्मल) प्रक्रियेतून पारपत्राचे नूतनीकरण (री- इश्यू ऑफ पासपोर्ट) करू इच्छिणारे ११०० अर्जदार या मेळाव्याचा लाभ घेऊ शकतील, अशी माहिती पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली.
‘तत्काळ’, ‘वॉक इन’, ‘ऑन होल्ड’ आणि ‘पीसीसी’ (पोलिस क्लीअरन्स सर्टिफिकेट) या प्रक्रियेतील अर्जदारांना या दिवशी सेवा पुरवली जाणार नाही. पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरच्या अर्जदारांना या मेळाव्यात अर्ज करता येईल.
मेळाव्यास उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांना आधी www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वत:ची नोंदणी करून अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज व ठरलेले शुल्क ‘ऑनलाइन’ भरल्यानंतर अर्जदाराला भेटीची वेळ घेता येईल. २४ डिसेंबरला (बुधवारी) दुपारी १२ वाजता शनिवारसाठीच्या भेटीच्या वेळा निश्चित करण्यास सुरुवात केली जाणार आहे. भेटीची वेळ मिळालेले अर्जदारच मेळाव्याला उपस्थित राहू शकतील. मेळाव्याला उपस्थित राहताना अर्जदारांना त्यांचा अर्ज क्रमांक (अ‍ॅप्लिकेशन रेफरन्स नंबर) व भेटीची वेळ नमूद केलेल्या पानाची मुद्रित प्रत आणि आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित व मूळ प्रती आणाव्या लागणार आहेत.