‘पाटणकर खाऊवाले’ हा ब्रँड आता खाद्यपदार्थापुरता किंवा सणावारांपुरता मर्यादित राहिलेला नाही. सोनिया पाटणकर खाऊच्या व्यवसायाची धुरा सांभाळत असतानाच रमेश पाटणकर आता इव्हेंट व्यवसायात ब्रँड ‘पाटणकर’चा ठसा उमटवत आहेत.

पुण्यात जन्मलेल्या आणि लहानाचे मोठे झालेल्या किंवा बाहेरून येऊन पुण्यात स्थायिक झालेल्या एकाही पुणेकराला ‘पाटणकर खाऊवाले’ माहीत नाहीत, असं होणं शक्यच नाही. ‘पाटणकर खाऊवाले’ या नावाची ब्रँड व्हॅल्यू आता फक्त पुण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. सातासमुद्रापारच्या देशांमध्ये राहणाऱ्या मराठी जनांनाही ‘पाटणकर खाऊवाले’ जिव्हाळ्याचे वाटतात. कुठलाही ब्रँड म्हटलं, की त्याचं नाव काहीतरी वेगळं, लक्षवेधी, अनेकदा इंग्रजी-मराठी धाटणीतलं असल्याचं पाहायला मिळतं. पण पाटणकरांच्या बाबतीत हे थोडंसं वेगळं आहे. ‘पाटणकर खाऊवाले’ हे अगदी बोलीभाषेतलं असावं तसं नाव या व्यवसायाला कसं पडलं, त्याचा आज आहे तो ब्रँड कसा तयार झाला अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली, ती ‘पाटणकर खाऊवाले’च्या सोनिया पाटणकर यांच्याशी झालेल्या गप्पांमधून..

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती

खाऊ म्हटलं की आताच्या लहान मुलांना फक्त चॉकलेट्स हवी असतात. पण माझ्या सासऱ्यांनी, वसंत आत्माराम पाटणकर यांनी ७५ वर्षांपूर्वी जेव्हा खाऊचा व्यवसाय करायचा ठरवला तेव्हा राजगिऱ्याची वडी, गूळपापडीचा लाडू, पौष्टिक वडय़ा म्हणजे खाऊ होता! पाटणकर आणि कंपनी या नावानं त्यांनी खाऊच्या व्यवसायाला सुरुवात केली. पुढे सासूबाई रोहिणी पाटणकर यांनी पापड, लोणची, विविध प्रकारच्या चटण्या अशा गोष्टी घरी तयार करून त्यांच्या विक्रीला सुरुवात केली. हाच व्यवसायाचा श्री गणेशा.. खरं तर तो काळ जे लागेल ते घरीच तयार करायचा होता. पण पाटणकर आणि कंपनीमध्ये मिळणारे पदार्थ, त्यांचा दर्जा बघून लोकांनी ते आपलंसं करायला सुरुवात केली. पुढे ‘खाऊवाल्या पाटणकरांकडून आणू’ हे एवढं रूढ झालं की त्यातूनच ‘ पाटणकर खाऊवाले’ हे आमच्या ग्राहकांनीच आम्हाला दिलेलं नाव आमचं ब्रँडनेम झालं असं सोनिया पाटणकर सांगतात. ‘पाटणकर खाऊवाले’ या ब्रँडची ओळख व्हायला इथून सुरुवात होते.

खाऊच्या व्यवसायाचा पसारा हळूहळू उकडीचे मोदक, पुरण पोळी, स्नॅक्स आणि सणावारांच्या गरजेप्रमाणे शाडू मातीच्या गणेश मूर्ती, पारंपरिक प्रकारचे आकाश कंदील, संक्रांतीला हलव्याचे दागिने अशा प्रांतात वाढायला सुरुवात झाली. १९९० मध्ये रमेश आणि सोनिया पाटणकर यांनी या व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली. सोनिया सांगतात, कोणते पदार्थ कसे बनवायचे, त्याची चव, दर्जा अशा प्रत्येक बाबतीत सासू-सासऱ्यांचे संस्कार आम्हा दोघांवर ही झाले. त्यामुळे त्यांच्या तालमीत तयार झाल्याने त्यांच्याच पद्धती पुढे नेत आम्ही व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. तो काळ पेठांमध्ये रहाणारे पुणेकर पेठांबाहेर स्थलांतरित होण्याचा होता. मग वर्षांनुवर्षे आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांपर्यंत आता आपण जावं या विचारातून आम्हीही बाजीराव रस्त्यावरून इतरत्र जायला सुरुवात केली. त्यामधूनच कोथरूड, सहकारनगर, पौड रस्ता, पिंपरी, चिंचवड अशा परिसरांमध्ये आम्ही आठ दुकानांमधून आमच्या ग्राहकांपर्यंत गेलो. ग्राहकांनीही या आठही दुकानांना भरभरून प्रतिसाद दिला.

काळ बदलला तशा ग्राहकांच्या आवडीनिवडी, चवी आणि गरजाही बदलल्या. लहान बाळांना फॅरेक्स सारख्या गोष्टी खायला घालण्याचा एक ट्रेंड त्या दरम्यान सुरू झाला होता. त्याचाच विचार करून शिशू आहारामध्ये अनेक प्रकार बनवायला सुरुवात केली. अनेक प्रकारच्या खिरी, सत्त्व, लाडू आणि पिठं आम्ही शिशू आहार म्हणून बाजारात आणली. महिला, तरुण मुलं, वृद्ध असे वयोगट नजरेसमोर ठेवून त्यांच्यासाठी पूरक आहार डिझाइन करण्यास सुरुवात केली. त्यातूनच मग पदार्थाचे पोषण मूल्य अभ्यासून, आहारतज्ज्ञांशी सल्लामसलत करून वाढीच्या वयातील मुलांसाठी प्रथिनांचे लाडू, नाचणीसत्त्वाचे लाडू किंवा नोकरदार महिलांसाठी गहू चिवडा, खाकरा, पौष्टिक लाडू असे पदार्थ उपलब्ध करून दिले. ज्येष्ठ नागरिकांची तब्येत, त्यांची हलक्या आहाराची गरज लक्षात घेऊन साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्य़ा, लाह्य़ांची पिठं, चटण्या असे पदार्थ ही सुरू केले.

जगभरातील मराठी कुटुंबं दिवाळी फराळ, संक्रांतीचे हलव्याचे दागिने यांच्यासाठीही ‘पाटणकर खाऊवाले’शी जोडली आहेत. गेली १७ वर्षे हलव्याच्या दागिन्यांमध्ये नटलेल्या लेकी-सुनांचे फोटो मागवून आम्ही त्यांच्या स्पर्धा घेतो आणि त्याला मिळणारा प्रतिसाद वर्षांनुवर्ष वाढत असल्याचंही सोनिया पाटणकर सांगतात. बदलत्या काळानुसार बदलण्याच्या हेतूने २००६-०७ मध्ये फोनवरून ऑर्डर्स घेणे आणि त्या घरपोच देणे हा महत्त्वाचा बदल अंगीकारला. २०११ मध्ये वेबसाइट आणि वेबस्टोअर सुरू केलं. त्याला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला, की बाजीराव रस्ता सोडल्यास उपनगरांमधली सगळी दुकानं बंद केल्याचं ही सोनिया यांनी सांगितलं.

सन २०१२ मध्ये सुरू झालेल्या ‘पाटणकर इव्हेंट्स’ या कंपनीमधून आपल्या संस्कृती आणि परंपरा जपत लग्न, मुंजी, बारसे, डोहाळेजेवणं, मंगळागौरी असे इव्हेंट्स आयोजित करण्याचे काम पाटणकर करत आहेत. इतकेच नव्हे तर अनेक कॉर्पोरेट इव्हेंट्सही या कंपनी मार्फत केले जातात. फक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर कर्नाटक, गुजरात राज्यांबरोबरच परदेशातही पाटणकर इव्हेंट्सचे ग्राहक आहेत. त्यांची मुलगी देवांगी पाटणकर हिच्या नेतृत्वाखाली ‘पाटणकर इव्हेंट्स’चं मुंबईच्या दादरमध्ये नवीन कार्यालयही लवकरच सुरू होतं आहे.

मराठी माणसं आणि उद्योग व्यवसाय या समीकरणावर अनेकदा अनेक प्रकारे बोललं जातं. टीकाही केल्या जातात. पण या सगळ्याला सन्माननीय अपवाद ठरतात ते ‘पाटणकर खाऊवाले’. त्यांच्या ब्रँडचं ब्रीदवाक्यच ‘जिव्हाळा.. जिभेला जिंकणारा’ असं आहे. अनेक वर्ष पुणेकरांच्या आणि आता सातासमुद्रापार पसरलेल्या मराठी कुटुंबांच्या जिभेला जिंकलेल्या पाटणकरांच्या जिव्हाळ्याने आता ‘इव्हेंट्स’मधून मराठी मनंही जिंकायला सुरुवात केलीय असं म्हणायला हरकत नाही!