अकरा वर्षांच्या प्रयत्नांनंतर धनंजय केळकर यांना पेटंट प्राप्त

भारतीय व्यक्तींच्या पायाच्या प्रमाणीकरणानुसार पादत्राणे तयार करण्याचे पेटंट ‘धनसई लॅबोरेटरीज’चे संशोधक धनंजय केळकर यांना प्राप्त झाले आहे. भारतीय व्यक्तींच्या पायांचे प्रमाणीकरण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असून, त्यांनी तयार केलेल्या पादत्राणांमुळे मधुमेही, संधिवात, गुडघेदुखी, टाचदुखीच्या रुग्णांना दिलासा मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे.

केळकर यांनी पत्रकार परिषदेत या विषयी माहिती दिली. केंद्र सरकारकडून मे २०१८ मध्ये त्यांना पेटंट प्रमाणपत्र प्राप्त झाले. केळकर यांना मिळालेले पेटंट हे पादत्राणांसाठी नाही, तर पायांसाठी आहे. या पेटंटप्रमाणे प्रत्येक पायाला स्वतंत्रपणे प्रमाणित केले जाते. भारतात पायांचे प्रामुख्याने तीन, चार आकार घेतात. भारतीय व्यक्तींचे पाय बऱ्यापैकी रुंद असतात आणि परदेशी मानकांवर आधारित पादत्राणे एकाच आकाराच्या पायांवर बेतलेली असल्याने भारतीयांसाठी ही पादत्राणे सोयीची ठरत नाहीत. या पेटंटमुळे भारतीय व्यक्तींच्या पायांचे वेगळेपण अधोरेखित झाले आहे.

‘भारतीय व्यक्तींचे पाय हे जगातील इतर पायांपेक्षा खूप वेगळे असतात. त्या दृष्टीने संशोधन करून २००७ मध्ये पेटंटसाठी अर्ज केला होता. त्याला मान्यता देताना अधिकारी पादत्राणांच्या पेटंटची माहिती घेत होते. त्यांना या पेटंटचे वेगळेपणच समजत नव्हते. त्यामुळे त्यात बरीच वर्षे गेली. अखेर त्यांची भेट घेऊन हे संशोधन समजावून सांगितल्यावर मान्यता मिळाली,’ असे केळकर यांनी सांगितले.

भारतीय पायांचे सतराशे आकृतिबंध

पायाला साजेशी आणि सुबक पादत्राणे मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केळकर यांच्याकडे पादत्राणांचे सतराशे आकृतिबंध तयार आहेत. त्यात पायांच्या मापाबरोबरच उभे राहणे, चालणे, पायातील दोष यांचाही विचार केला करण्यात आला आहे. पाय, टाचा, गुडघेदुखीची कारणे यातच दडलेली असतात. पायाच्या नंबरनुसार पादत्राणे तयार केली जातात. त्यामुळे चालण्यात सहजता येते, पायाच्या कुठल्याही भागावर अनावश्यक दाब पडत नाही, असे त्यांनी सांगितले.