पुण्यात एका ७५ वर्षीय रुग्णाने उपचार करणाऱ्या डॉक्टरवर चाकूने हल्ला केला. यामध्ये डॉक्टर डॉ. संतोष आवारी यांच्या पोटावर आणि हाताला जखम झाली असून त्यांना तीन टाके पडले आहेत. सिंहगड रोडवरील नांदेड फाटा येथील सिंहगड स्पेशालिटी या रुग्णालयात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.

डॉ. संतोष आवारी हे बीएचएमएस डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे ३ ते ४ दिवसांपूर्वी ७५ वर्षीय रुग्ण त्यांच्या रुग्णालयात दाखल झाला होता. डॉ आवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला औषधोपचाराने बरे वाटत होते, पण आणखी ३ ते ४ दिवस रुग्णालयातच थांबण्याचा सल्ला डॉक्टरनी या रुग्णाला दिला होता. या रुग्णाला दम्याचा त्रास सुरु होता. डॉ आवारी सायंकाळी सिंहगड हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले असता रुग्णाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.

या रुग्णाला एका नातेवाईकाने डॉक्टरने बिल जास्त लावले असल्याचे सांगितल्यामुळे हा हल्ला केल्याचे चर्चा रंगली होती. मात्र त्याला डिस्चार्ज देण्यात आला नव्हता त्यामुळे कोणतेही बिल केले नव्हते, असे डॉ आवारी यांनी सांगितले. याप्रकरणी अभिरुची पोलीस चौकीत रुग्णाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.