05 June 2020

News Flash

औषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा

आठवडय़ाभरात ४०० ग्राहकांना औषधे घरपोच

ग्राहकांना घरपोच औषधे देतानाच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे.

घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आल्यानंतर किमान रोजच्या औषधांसाठी तरी धडपडत रस्त्यावर येणाऱ्यांना दिलासा म्हणून औषधे थेट घरपोच देण्यास विक्रेत्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांची  गैरसोय टाळण्यास मदत होत आहे.

फग्र्युसन महाविद्यालय रस्त्यावरील राहुल मेडिकल स्टोअरचे इंदानी कुटुंबीय ४० वर्षांहून अधिक काळ औषध विक्री क्षेत्रात कार्यरत आहेत. कोहिनूर इंदानी यांनी याबाबत माहिती दिली. कोहिनूर म्हणाले, संचारबंदीचा निर्णय झाल्यानंतर दैनंदिन गरजेची औषधे मिळतील का याबाबत अनेक नागरिकांमध्ये संभ्रम होता. त्यांनी बाहेर पडून एकमेकांच्या संपर्कात येऊ नये यासाठी आम्हीच त्यांना घरपोच औषधे देण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी दिलेली जुनी औषधांची चिठ्ठी फोनवरून मागवून घेऊन त्याप्रमाणे किमान वीस दिवसांची औषधे पुरवण्याचा प्रयत्न करतो. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाबाची किंवा गरोदर महिलांची ‘लाईफ सेव्हिंग ड्रग’ प्रकारची औषधे यात प्राधान्याने देतो. मागील काही दिवसात तीन ते चार गाडय़ांमधून औषधांची पाकिटे घेऊन शहरभर पोहोचवत आहोत.

किमान ४०० कुटुंबांना औषधे पोहोचवली आहेत. शक्यतो सोसायटीच्या प्रवेशद्वारावरच ग्राहकांकडे औषधे सुपूर्द करतो. औषधांची पाकिटे देताना त्यावर सॅनिटायझर फवारतो. रोख पैसे नको, ऑनलाइन किंवा इतर स्वरूपात पैसे द्या असा आग्रह ग्राहकांना करतो. विक्रेता आणि ग्राहक यांचे नाते कायमस्वरूपी असते, या संकटकाळात शक्य तेवढी त्यांची सोय पहाणे हे कर्तव्य मानून त्याच भावनेतून हे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलीस, गरजूंसाठीही मदत

औषधे घरपोच देण्यासाठी शहराच्या कानाकोपऱ्यात फिरताना बंदोबस्तावरचे पोलीस नजरेस पडतात. स्वत:चा जीव धोक्यात घालून ते काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी मास्क, सॅनिटायझर अशा वस्तू सोबत ठेवतो. त्याचे विनामूल्य वाटप करतो. ते कसे वापरावे याची माहिती देतो. गरजूंसाठी थोडे अन्नपदार्थही जवळ ठेवतो, कोणी गरजू आढळल्यास त्यांची एकवेळची भूक तरी भागवता यावी हा प्रयत्न आहे, अशी माहिती इंदानी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2020 12:57 am

Web Title: patient service of the medicine dealer abn 97
Next Stories
1 परदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा
2 CoronaVirus : पुण्यात दिवसभरात आढळले चार करोना बाधित
3 CoronaVirus : जनजागृतीसाठी पुणे पोलिसांकडून अनोखी शक्कल
Just Now!
X