चिन्मय पाटणकर chinmay.reporter@gmail.com

सातत्याने विविध नाटय़प्रयोग सादर होणाऱ्या पुण्यात एक अनोखा प्रयोग साकारतो आहे. हा प्रयोग आहे अभिवाचनाच्या १२ भागांच्या ‘पत्र निमित्तमात्र’ मालिकेचा..

सध्या काळ आहे सीरिजचा अर्थात मालिकांचा.. टीव्हीवरच्या मालिकांपेक्षा चर्चा होते ती वेब सीरिजची.. पण अभिवाचनाची मालिका सादर करण्याचा अभिनव प्रयोग ‘रंगभाषा’ ही संस्था सादर करत आहे. मराठी साहित्यविश्वात गाजलेल्या कथाकार जी. ए. कुलकर्णी आणि सुनीता देशपांडे यांच्यातील पत्रसंवादावर ‘पत्र निमित्तमात्र’ ही मालिका आधारित आहे. १३ जुलैपासून ही मालिका सुरू होत असून दर महिन्याला दोन प्रयोग अशा पद्धतीने एकूण १२ भाग सादर करण्याचे नियोजन आहे.

गेल्या काही काळात पुण्यात अभिवाचन हा प्रकार मोठय़ा प्रमाणात हाताळला जाऊ लागला आहे. नाटक, कविता, ललित लेख असे साहित्यप्रकार अभिवाचनाच्या माध्यमातून सादर केले जात आहेत. त्यात आता पत्र या प्रकाराचीही भर पडत आहे.  सुनीताबाई आणि जी. ए. कुलकर्णी यांच्यातील पत्रसंवाद जवळपास आठ वर्षे सुरू होता. अनेक विषयांवर त्यांनी एकमेकांना पत्र लिहिली. मनमोकळे करणाऱ्या व्यक्तिगत संवादासह या पत्रांतून व्यक्त झालेलं जीवनचिंतन हे या पत्रांचं वैशिष्टय़. या पत्रसंवादातील निवडक पत्रांचे संकलन असलेले ‘प्रिय, जीए’ हे पुस्तकही प्रकाशित झालं. पुलंच्या जन्मशताब्दी वर्षांत या पत्रसंवादातलं नाटय़ अभिवाचनाच्या माध्यमातून उलडण्याचा वेगळा प्रयोग करण्यात येत आहे. या मालिकेसाठी ‘जीएंची निवडक पत्रे खंड १’ आणि ‘प्रिय, जीए’ या पुस्तकांचा संदर्भ घेतला आहे. या अभिवाचन मालिकेची संकल्पना संकल्पना वैशाली कणसकर यांची आहे. अमृत सामक यांनी दिग्दर्शन, निखिल गाडगीळ यांनी प्रकाशयोजना, गौरी दामले यांची चित्रे आहेत. धीरेश जोशी आणि शुभांगी दामले अभिवाचन करणार आहेत. शनिवार पेठेतील सुदर्शन रंगमंच येथे सायंकाळी सात वाजता या मालिकेतील पहिला भाग सादर होईल.

‘जीए आणि सुनीताबाईंनी एकमेकांना ६० पत्रं लिहिली. ही पत्रं नेहमीच्या पत्रांपेक्षा वेगळी होती. त्याला साहित्य मूल्य होतं. या पत्रांतून त्यांच्यात विविध साहित्यकृती, लेखक, त्यांचं लेखन यावर सविस्तर चर्चा झाली. एकमेकांतील मतभेद स्वीकारून, आदर करून हा पत्रसंवाद खुलत गेला. त्यामुळेच या पत्रांमध्ये एक प्रकारे नाटय़ आहे. हे नाटय़ रंगमंचावर आणण्याचा विचार होता. त्यासाठी जानेवारीपासून त्याचा अभ्यास केला. केवळ एखाद्या कार्यक्रमातून अभिवाचन आटोपण्यापेक्षा त्याला मालिकेच्या रूपात आणण्याची संकल्पना पुढे आली. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांचे हक्क आणि मालिकेसाठीची परवानगी मिळवली,’ असे दिग्दर्शक अमृत सामकनं सांगितलं.