पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणारे पवना धरण ८५ टक्के भरले असून धरणातून ३ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गुरुवारी चारच्या सुमारास धरणाचे सहा दरवाजे अर्धा फूट उघडून त्यावाटे पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मावळ परिसरात अतिवृष्टीसदृश्य पाऊस कोसळत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या ८५ टक्के पवना धरण भरले असून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे धरणातील पाणी साठा लक्षात घेऊन धरणातून सहा दरवाजातून ३हजार 500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

Exclusive : ठाणे मनोरुग्णालयाची कापलेली वीज मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे तासाभरात सुरु!

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये पवना धरण ओव्हर फ्लो झाले होते. तसेच पाण्याचा विसर्गही करण्यात आला होता. यावर्षी मात्र एक महिन्याअगोदर धरण ओव्हर फ्लो होण्याच्या दिशेने असून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. विद्युत जनित्राद्वारे १ हजार ४०० तर, सांडव्यामधून २ हजार १०० असा एकूण 3 हजार 500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. धरण ओव्हर फ्लो होण्याच्या दिशेने असले तरी पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी मिळत आहे. हे मात्र खरं आहे.