महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळावी, या हेतूने पिंपरी महापालिकेने सुरू केलेल्या, मात्र सत्ताधाऱ्यांमधील वादामुळे दरवर्षी वादाच्या भोवऱ्यात सापडणारी ‘पवनाथडी जत्रा’ यंदा ‘सांगवी की पिंपरी’त या वादावर ‘कारभारी’ अजित पवार यांनी तोडगा काढला आहे. ‘सांगवीकर’ असलेले स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे जत्रा सांगवीत भरावी म्हणून कमालीचे आग्रही होते. मात्र, पवनाथडी सांगवीत झाल्यास त्याचे पूर्ण श्रेय भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना मिळेल, म्हणूनच राष्ट्रवादीने शितोळेंचा हिरमोड करत पिंपरीवर शिक्कामोर्तब केले.
महिला बालकल्याण समितीने पिंपरीत पवनाथडी जत्रा घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. तथापि, खर्चास मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आल्यानंतर अध्यक्ष शितोळे यांनी सलग तीन आठवडे हा प्रस्ताव तहकूब ठेवला. दोन्ही समित्यांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे सावळा गोंधळ झाला होता. त्यातच, अ, ब, क, ड, ई आणि फ या सहाही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत स्वतंत्रपणे पवनाथडी आयोजित करण्याचा विचार पुढे आणण्यात आला. मात्र, त्यावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. एका पवनाथडीसाठी ५० लाखांचा खर्च होतो. सहा ठिकाणी ही जत्रा भरवल्यास होणारा खर्च महापालिकेला परवडणार नाही, या मुद्दय़ावरून सहा ठिकाणी कार्यक्रम करण्याचा प्रस्ताव निकाली काढण्यात आला. मात्र, ‘सांगवी का पिंपरी’चा तिढा कायम राहिला.
पवनाथडी जत्रा कोठे भरवायची याबाबतच्या वादात अखेर सलग तिसऱ्या वर्षी सांगवीत पवनाथडी नको, अशी सूचना अजितदादांनी केली. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनाही सांगवीत पवनाथडी घेतल्यास आमदार जगतापांना श्रेय मिळेल, अशी धास्ती होतीच. या विषयात महापौरांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलीच नाही. स्थायी समितीचे अध्यक्ष शितोळेही एकटे पडले. अखेर, पिंपरीवर शिक्कामोर्तब झाले.

सलग दोन वर्षे सांगवीत पवनाथडी जत्रा झाली होती. त्यामुळे यंदा ही जत्रा पिंपरीत घेण्याचा निर्णय झाला. जत्रा कोठे आयोजित करायची हा विषय मी फार ताणून धरला नाही.
अतुल शितोळे, अध्यक्ष स्थायी समिती