प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी; दिवसर-रात्र पार्किंगचा प्रस्ताव बारगळला

संपूर्ण शहरातील रस्त्यांवर दिवस-रात्र पे अ‍ॅण्ड पार्क योजना राबविण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध झाल्यानंतर संपूर्ण शहराऐवजी पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर पे अ‍ॅण्ड पार्क योजना राबविण्याचा निर्णय महापालिकेच्या मुख्य सभेत शुक्रवारी मध्यरात्री बहुमताने घेण्यात आला. पार्किंग शुल्काच्या दरनिश्चितीसाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकारी आणि सर्वपक्षीय गटनेत्यांची समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला असून दिवस-रात्र पार्किंग ऐवजी फक्त दिवसा शुल्क आकारणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण व्हावे आणि खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण राहावे यासाठी महापालिका प्रशासनाने पार्किंग धोरण आखले आहे. या धोरणाअंतर्गत रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांकडून शुल्क आकारणी प्रस्तावित होती. त्यानुसार दुचाकी गाडय़ांसाठी प्रतितास किमान दोन ते कमाल चार रुपये शुल्क, तर चारचाकी गाडय़ांना प्रतितास किमान १० ते कमाल २० रुपये शुल्क आकारणी करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. याशिवाय रात्रीही रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या गाडय़ांकडून शुल्क आकारणी करण्याचा प्रस्ताव होता.

या निर्णयाच्या विरोधात शहरात तीव्र पडसाद उमटले आणि सत्ताधारी भाजपवर टीका सुरू झाली. महापालिका आयुक्त आग्रही असलेल्या या धोरणाला मुख्य सभेची मंजुरी घेण्यासाठी शुक्रवारी मुख्य सभेपुढे हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. विरोधामुळे सत्ताधारी भाजपने दोन पाऊले मागे येत काही उपसूचना दिल्या. त्यानुसार शहरातील सर्व रस्त्यांच्या ऐवजी पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यास मंजुरी दिली.

पार्किंग धोरणाचा अभ्यास करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकारी आणि सर्वपक्षीय गटनेत्यांची समिती नेमावी. या समितीने काही बाबींचा अभ्यास करून सहा महिन्यात अहवाल द्यावा, ही उपसूचना मुख्य सभेत मान्य करण्यात आली. महापालिकेने गेल्या २० वर्षांत आरक्षित केलेल्या पार्किंगच्या जागा, त्यांचे विकसन यांचा आढावा घ्यावा, ताब्यात आलेल्या पार्किंगच्या जागांवर बहुमजली पार्किंग विकसित करण्याचा अहवाल तयार करावा, पार्किंगच्या जागा बीओटी तत्त्वावर विकसित करण्याबाबत अभ्यास करावा, पार्किंग शुल्कातून मिळणारे उत्पन्न पार्किंग व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर खर्च करावे, या बाबींवर ही समिती काम करणार आहे.

मुख्य सभेतील निर्णय..

  • पाच रस्त्यांवर पे अ‍ॅण्ड पार्क
  • या पाच रस्त्यांवर दिवसा पे अ‍ॅण्ड पार्क
  • पार्किंग धोरणाबाबत समितीची स्थापना
  • अहवालासाठी समितीला सहा महिन्यांची मुदत