शहरातील पंधरा प्रमुख रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पे अॅन्ड पार्क योजना लागू करण्याचा महापालिका प्रशासनाचा वादग्रस्त प्रस्ताव अखेर मंगळवारी फेटाळण्यात आला. महापालिकेच्या मुख्य सभेत हा प्रस्ताव पुकारण्यात आल्यानंतर त्याला कोणत्याही पक्षाने अनुमोदन न दिल्यामुळे तो आपोआप वगळला गेला. गेली दोन वर्षे हा प्रस्ताव मुख्य सभेपुढे मंजुरीसाठी होता.
पे अॅन्ड पार्कचा प्रस्ताव प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी मांडला होता. दुचाकींना सुरुवातीला पाच व चारचाकींना दहा रुपये, तसेच त्यानंतर प्रत्येक तासाला विशिष्ट रक्कम अशा स्वरुपाचा हा प्रस्ताव वादात सापडला होता. शहरातील पंधरा प्रमुख रस्त्यांवर ही योजना राबवली जाणार होती. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची या संबंधीची भूमिका निश्चित होत नव्हती, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा या प्रस्तावाला प्रथमपासून विरोध होता. यापूर्वी ज्या ज्या वेळी हा प्रस्ताव मुख्य सभेपुढे मंजुरीसाठी आला त्या वेळी त्याला विरोध झाल्यामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता.
हा प्रस्ताव मंगळवारी मुख्य सभेपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आल्यानंतर त्याला कोणत्याही पक्षाच्या सदस्यांनी अनुमोदन दिले नाही. सभा कामकाज नियमावलीनुसार एखाद्या प्रस्तावाला अनुमोदन दिले गेले नाही, तर संबंधित प्रस्ताव विषयपत्रिकेवरून वगळला जातो. त्यानुसार अनुमोदन न मिळाल्यामुळे हा प्रस्ताव अखेर वगळला गेला. त्यामुळे तो रद्दबातल झाला.
शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर चारचाकी वाहनांसाठी पे अॅन्ड पार्क योजना लागू करण्यात आली होती. त्यानंतर शहरातील अनेक रस्त्यांवर ही योजना लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. तसेच त्यात दुचाकींचाही समावेश करण्यात आला होता. मात्र, पे अॅन्ड पार्कची ही योजना शहरात वादग्रस्त ठरली होती आणि त्यातून दुचाकींना वगळावे, अशीही मागणी राजकीय पक्षांकडून तसेच स्वयंसेवी संस्थांकडूनही सातत्याने झाली होती. सन २००७ मध्ये हा विषय शहरात गाजला होता. त्यानंतर शहरात कोणत्याही रस्त्यावर अशी योजना राबवू नये, असा आदेश प्रशासनाला देण्यात आला होता. त्यानंतरही पुन्हा तशाच स्वरुपाची योजना आणण्यात आल्यामुळे योजनेला कोणत्याही पक्षाने समर्थन दिले नाही.