शहरातील रस्त्यांवर फक्त चार चाकी वाहनांसाठी पे अॅन्ड पार्क ही योजना राबवावी. मात्र दुचाकींसाठी पे अॅन्ड पार्क योजना राबवू नये. दुचाकींना या योजनेतून वगळावे, असा निर्णय महापालिकेच्या मुख्य सभेत बुधवारी एकमताने घेण्यात आला.
शहरातील रस्त्यांवर दुचाकींसाठी पे अॅन्ड पार्क योजना राबवू नये, तसेच चार चाकींसाठी जेथे पे अॅन्ड पार्क योजना राबवली जात आहे त्याच्या ठेक्याची मुदत वाढवू नये, असा ठराव मुख्य सभेत यापूर्वीच मंजूर करण्यात आला होता. मात्र, या निर्णयाच्या विरोधात महापालिका प्रशासन राज्य शासनाकडे गेले होते आणि हा ठराव विखंडित करावा असे पत्र प्रशासनाने शासनाला दिले होते. सर्व रस्त्यांवर दुचाकी व चार चाकींसाठी पे अॅन्ड पार्क योजना राबवावी असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे होते. या योजनेबाबत पुणे महापालिकेने तीस दिवसात निर्णय घ्यावा, असे पत्र राज्य शासनाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार पे अॅन्ड पार्क योजना राबवण्याचा तसेच ठेक्याला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.
शहरातील रस्त्यांवर दुचाकींसाठी पे अॅन्ड पार्क योजना राबवू नये, अशी आग्रही भूमिका काँग्रेसचे गटनेता आणि विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांनी सभेत मांडली. दुचाकींना ही योजना असू नये असा निर्णय यापूर्वीच झालेला होता. तरीही प्रशासन राज्य शासनाकडे गेले ही बाबही त्यांनी सभेच्या निदर्शनास आणून दिली. मुळात, दुचाकींना या योजनेतून वगळावे असा निर्णय महापालिकेच्या मुख्य सभेने यापूर्वीच घेतलेला असताना प्रशासन राज्य शासनाकडे का गेले, अशी विचारणा उपमहापौर आबा बागूल यांनी या वेळी केली.
प्रशासनाने शहरातील रस्त्यांवर चार चाकी वाहनांना पे अॅन्ड पार्क योजना राबवावी. त्यासाठीच्या निविदेची मुदत संपली असेल, तर फक्त चार चाकींच्या पे अॅन्ड पार्क योजनेसाठी फेरनिविदा काढावी. मात्र दुचाकींसाठी ही योजना राबवू नये, अशी उपसूचना सभेत अरविंद शिंदे, भारतीय जनता पक्षाचे अशोक येनपुरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेता बाबू वागसकर यांनी सभेत मांडली. ही उपसूचना सभेत एकमताने मंजूर करण्यात आली. ही उपसूचना मंजूर झाल्यामुळे शहरात दुचाकींसाठी पे अॅन्ड पार्क योजना राबवता येणार नाही.