पुणे-मुंबई शहरात वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण मोठे आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून दंडाची वसुली करण्यासाठी राज्य वाहतूक विभागाने वर्षभरापूर्वी ‘एक राज्य एक चलन’ योजना सुरू केली. मात्र, ऑनलाइन पद्धतीने दंड भरण्याचे प्रमाण कमी असल्याने पुणे-मुंबईतील थकीत दंडाची रक्कम वाढत आहे. त्यामुळे आता राज्य वाहतूक विभागाने या दोन्ही शहरांतील वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंडाची वसुली ऑनलाइन पद्धतीसह रोखीने करण्याचे आदेश दिले आहेत.

हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालविणे, सम-विषम दिनांक न पाहता वाहने लावणे, विना परवाना वाहने चालविणे, मोबाइलवर संभाषण यासह विविध प्रकारचे नियमभंग करण्याचे प्रमाण राज्यात वाढत आहे. वाहनचालकांकडून दंड वसुलीसाठी एक राज्य एक चलन (वन स्टेट वन चलन) ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

रोखीने पैसे घेण्याऐवजी नियमभंग करणाऱ्यांकडून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा वापर करून ऑनलाइन दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी राज्यभरातील वाहतूक पोलिसांना ई-चलन यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली. ई-चलन यंत्राचा वापर करण्याबाबतचे प्रशिक्षण वाहतूक पोलिसांना देण्यात आले होते.

मुंबईत वाहतुकीचा नियमभंग केलेल्या वाहनचालकाकडून पुण्यातही दंड वसूल करण्याची सुविधा या यंत्राद्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती. संबंधित वाहनचालकाने केलेल्या नियमभंगाची माहिती, छायाचित्र त्वरित उपलब्ध होत असल्याने सुरुवातीला ई-चलन यंत्राद्वारे करण्यात आलेली कारवाई वेगात झाली.

रोख स्वरूपात मिळणाऱ्या नोटा काळजीपूर्वक हाताळाव्यात. मुखपट्टी, जंतुनाशकांचा वापर प्राधान्याने करावा, असे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत.

पुणे-मुंबई शहरात एक राज्य एक चलन योजना राबविण्यात आल्यानंतर रोखीने दंड स्वीकारण्याची पद्धत बंद करण्यात आली. डेबिट कार्ड तसेच ऑनलाइन पद्धतीने दंड वसुलीस प्राधान्य देण्यात आले. मात्र, या दोन्ही शहरांत थकीत दंडाची रक्कम वाढत असल्याने आता रोखीने दंड वसूल करण्यात यावा, असे आदेश नुकतेच दिले आहेत. ऑनलाइनबरोबर रोखीने दंड स्वीकारण्यात येणार आहे.

– राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग, पुणे पोलीस