माजी उपमुख्यमंत्री व पिंपरी पालिकेचे ‘कारभारी’ अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय असलेले आयुक्त राजीव जाधव यांना स्वत:ची तडकाफडकी बदली होईल, अशी धास्ती आहे. चिंचवडला एका कार्यक्रमात अजितदादांसमोरच त्यांनी ही भीती बोलून दाखवली. निरोप समारंभ असल्याप्रमाणेच आयुक्तांनी केलेल्या येथील भाषणावर बोलताना, एवढे काय घाबरता, आम्ही आहोत की, अशा सूचक शब्दात अजितदादांनी त्यांना ‘दिलासा’ दिला.
राजीव जाधव अजितदादांचे ‘विश्वासू’ अधिकारी आहेत. यापूर्वीचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीचे अजितदादांनी निश्चित केल्यानंतर जाधवांची त्यांनी वर्णी लावली. जाधव यांच्यावर राष्ट्रवादीची कृपादृष्टी असली आणि राष्ट्रवादीच्या तालावरच त्यांचा कारभार सुरू असला, तरी सर्वच पक्षांच्या नेत्यांना ‘खूश’ ठेवण्याची खबरदारी आयुक्तांनी घेतली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून आयुक्तांच्या बदलीची सातत्याने चर्चा सुरू आहे. भाजपच्या बहुतांश स्थानिक नेत्यांनी, पालिका निवडणुकीवेळी जाधव नकोत, अशीच मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याने त्यांच्या बदलीची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत ते बदलीचा विषय फारशा गांभीर्याने घेत नव्हते. मात्र, सोमवारी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात त्यांनी मनातील बदलीची धास्ती बोलून दाखवली. पुन्हा बोलायची संधी मिळेल की नाही माहीत नाही, असे सांगत आजच सगळे बोलून घेतो, असे ते म्हणाले. आयुक्तांचे हे निरोप समारंभाचे भाषण आहे की काय, असा सूर उपस्थितांमध्ये होता. खासदार श्रीरंग बारणे तसेच अजितदादांनी अशीच टिपणी केली. २० मिनिटांच्या भाषणात आयुक्तांनी चौफेर फटकेबाजी केली. आपण सनदी अधिकारी आहोत, हे विसरून ‘स्मार्ट सिटी’ प्रकरणी शासनाने पिंपरीवर अन्याय केला आणि तो भरून काढण्यासाठी शहराचा ‘अमृत’ योजनेत समावेश करावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. पिंपरी-चिंचवड अगोदरपासूनच स्मार्ट आहे, असे सांगून पालिकेच्या विविध प्रश्नांसाठी आमदारांनी राज्य शासनाकडे तर खासदारांनी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची विनंती त्यांनी केली. शहरातील वाढत्या गुन्हेगारीविषयी चिंता व्यक्त करत स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. अजितदादांनी आयुक्तांचा हा नूर अभावानेच पाहिला होता. आयुक्तांचे भाषण ते लक्ष देऊन ऐकत होते. बदलीला एवढे काय घाबरता, आम्ही आहोत की असे सूचक विधान अजितदादांनी त्यांच्या भाषणात केले.