X

पिंपरी महापालिका आयुक्त कार्यालयांत, कर्मचारी उपाहारगृहात!

या प्रकरणी कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.

अचानक पाहणीत कर्मचारी जागेवर आढळले नाहीत; आयुक्तांचे कारवाईचे संकेत

महापालिकेचे कर्मचारी जागेवर नसतात, बाहेर घुटमळत असतात, यांसारख्या तक्रारी सातत्याने होत असताना, उशिरा का होईना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या तक्रारींची दखल घेतली. आयुक्तांनी गुरुवारी (५ ऑक्टोबर) सकाळी तासभर पालिकेच्या विविध विभागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, तेव्हा बहुतांशी ठिकाणी त्यांना शुकशुकाट दिसून आला. पालिकेच्या उपाहारगृहात गेल्यानंतर त्यांना तेथे कर्मचाऱ्यांचे ठिय्ये दिसले. आयुक्तांना पाहून अनेकांना पळता भुई थोडी झाली. या प्रकरणी कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.

महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त पालिकेच्या कार्यक्रमासाठी आयुक्त सकाळीच मुख्यालयात आले होते. पदाधिकारी येण्यासाठी वेळ होता म्हणून आयुक्तांनी तळमजल्यावरील कार्यालयांची पाहणी सुरू केली. या वेळी सहआयुक्त दिलीप गावडे त्यांच्यासमवेत होते. निवडणूक विभाग, भूमीजिंदगी, मध्यवर्ती भांडार, सुरक्षा, जनसंपर्क, करसंकलन, नगररचना, मुख्य लेखा विभाग, अभिलेख कक्ष, स्वच्छ भारत कक्ष आदी कार्यालयांमध्ये ते गेले. बहुतांशी ठिकाणी तेथील कर्मचारी जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही कार्यालयात कर्मचारी आलेले नव्हते, तर काही ठिकाणी कर्मचारी येऊन पुन्हा बाहेर गेले होते. तळमजल्यावरील सर्व कार्यालयांची पाहणी झाल्यानंतर आयुक्तांनी आपला मोर्चा मुख्यालयातच असलेल्या उपाहारगृहाकडे वळवला. तेथे कामाच्या वेळेतच कर्मचारी ‘टाइमपास’ करताना दिसून आले. आयुक्त उपाहारगृहात येत असल्याची चाहूल लागल्याने मिळेल त्या मार्गाने बरेच कर्मचारी पळून गेले. ज्यांना पळणे शक्य झाले नाही, ते आयुक्तांच्या तावडीत अलगद सापडले. आयुक्तांनी सर्वाचीच कानउघाडणी केली. नागरिक कामासाठी मुख्यालयात येतात. त्यांना जागेवर कोणी सापडत नाही आणि तुम्ही या ठिकाणी वेळकाढूपणा करत आहात, अशा शब्दात त्यांनी कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. या वेळी सापडलेल्या कर्मचाऱ्यांची नावे टिपून घेण्यात आली. त्यांना या प्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासन विभागास दिले.

उपाहारगृहचालकास तंबी

पालिका मुख्यालयातील उपाहारगृहात प्रचंड अस्वच्छता होती, ते चित्र पाहून आयुक्त संतापले. त्यांनी उपाहारगृह चालकास बोलावून घेतले आणि या अस्वच्छतेबद्दल जाब विचारला. यापुढे अशी अस्वच्छता खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी आयुक्तांनी दिली.

Outbrain