पिंपरी: पिंपरी पालिकेतील सत्तारूढ भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुरघोडीच्या राजकारणात पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर चांगलेच कचाटय़ात सापडले आहेत. भाजपचे हस्तक, प्रवक्ते अशी टीका यापूर्वी भाजपविरोधकांकडून होत होती. सध्याच्या  बदलत्या परिस्थितीत आयुक्तांवर राष्ट्रवादीधार्जिणेपणाचा आरोप भाजप नेते करू लागले आहेत. आयुक्तांनी मात्र याविषयी प्रतिक्रिया दिली नाही.

हर्डीकरांची तीन वर्षांपूर्वी पालिका आयुक्तपदी वर्णी लागली, तेव्हा राज्यात भाजपची सत्ता होती. देवेंद्र फडणवीस यांचे हर्डीकर निकटवर्तीय होते. त्यामुळे सुरूवातीला पिंपरी पालिकेत भाजप नेत्यांच्या मर्जीनुसार हर्डीकर वागत होते. त्यावरून भाजपविरोधी गटात त्यांच्यावर प्रचंड आगपाखड होत होती. विरोधकांना ते किंमत देत नाही, विरोधी नगरसेवकांची कामे करत नाहीत, इथपासून ते भाजपच्या कार्यालयात जाऊन बैठका घेतात. ते भाजपचे प्रवक्ते, कार्यकर्ते आहेत, असे अनेक आरोप त्यांच्यावर होत होते.

राज्यात खांदेपालट झाल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री झाले. त्यानंतर, पवार िपपरी पालिकेच्या निर्णयात लक्ष घालू लागले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा भाव वधारला. पालिकेत भाजपची सत्ता असतानाही त्यांना न रूचणारे आणि राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणारे निर्णय आयुक्त घेऊ लागले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. परिणामी, महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके यांच्यापासून भाजपचे अनेक नगरसेवक आयुक्तांवर  जाहीरपणे टीका करू लागले. आयुक्तांनी भाजपला बदनाम करण्याचे षडयंत्र चालवले आहे, असा आरोप अलीकडेच महापौरांसह पक्षाच्या नगरसेवकांनी केला. पालिका सभेतही भाजपकडून आयुक्तांना लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादीने आयुक्तांच्या कार्यपद्धतीचे समर्थन करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येते. आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादीचे कुरघोडीचे, श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे.

आयुक्त पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यांच्याच स्वाक्षरीने मंजूर झालेले प्रस्ताव नंतर ते मागे घेतात. शिक्षण विभागाचे विषयपत्र मागे घेऊन स्थायी समितीत त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली, यामागे हाच दबाव आहे. त्यांच्या बदललेल्या कार्यपध्दतीमुळेच पक्षाची बदनामी होत असल्याची भावना भाजप नगरसेवकांमध्ये आहे.

– नामदेव ढाके, सत्तारूढ पक्षनेते

आयुक्त भाजपला बदनाम करत असल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हेच आयुक्त कार्यरत आहेत. तेव्हा त्यांच्या कार्यपद्धतीमुळे भाजपची बदनामी होत नव्हती का, आताच त्यांना बदनामीचा साक्षात्कार कसा झाला. शिक्षण मंडळाच्या खरेदीचे विषयपत्र आयुक्तांनी मागे घेतल्याने भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागले आहे.

– संजोग वाघेरे, पिंपरी शहराध्यक्ष, राष्ट्रवादी.