पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहआयुक्त सुनील रामानंद यांनी पुण्यातील अवैध धंदे बंद करण्याची मोहीम सुरू केली. पिंपरी-चिंचवड शहरातही कित्येक महिन्यांपासून अवैध धंद्यांचा सुळसुळाट असून त्याला थेट पोलिसांचाच आशीर्वाद आहे. राजकीय हस्तक्षेप आणि पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे गल्लीबोळात भाई तयार झाले आहेत. पोलिसांच्या उघड हप्तेगिरीमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नसून शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पिंपरी-चिंचवडसाठी
स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होईल तेव्हा होईल. आताच डोक्यावरून पाणी जाऊ लागले असून पोलीस आयुक्तांनी पिंपरीतही लक्ष घालावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
उद्योगनगरीत मोठय़ा गुन्ह्य़ांचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी वाहनचोऱ्या, घरफोडय़ा, सोनसाखळी चोरीचे गुन्हे अधिक आहेत. किरकोळ कारणावरून खुनाच्या घटनांचे सत्र कायम असून महिन्याला दोन खुनांची सरासरी आहे. बलात्काराच्या घटना कमी होण्याची चिन्हे नाहीत. अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे. भाटनगर दारूचे माहेरघर असून संपूर्ण शहराला तेथून बेकायदेशीर दारूपुरवठा होतो. निगडीतील ओटा स्कीम, मोशीतील औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या जागेत मटक्यांचे अड्डे आहेत. यमुनानगर रुग्णालयाशेजारील भागात, जाधववाडीच्या मोकळ्या जागेत दारूविक्री केली जाते. ताथवडे, काळाखडक, भोसरी, कासारवाडी, दापोडी, अजंठानगर, चिखली, वाकड, डुडळगाव, चऱ्होली, नेरे, जांबे अशी भली मोठी यादी आहे, जिथे सर्रास दारूविक्री होते. चिंचवडच्या चापेकर चौकात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर वेताळनगरला दारूधंदे आहेत. असा एखादा भाग नसावा, जिथे अवैध दारूविक्री होत नाही. ‘ओपन बार’ ही शहरवासियांच्या दृष्टीने डोकेदुखी आहे. रस्त्यावर कुठेही दारू विकली जाते. चायनीज गाडय़ांवर सर्रास दारू मिळते. तिथे दारुडय़ांचा धुडगूस सुरू असतो. पोलीस कारवाईचे फक्त नाटक करतात. रात्री अकरापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी असली तरी पहाटेपर्यंत हॉटेल सर्रास सुरू असतात. िपपरी बाजारपेठेतील एक ‘सुंगधी’ हॉटेल आणि िपपळे सौदागरचे पब पहाटेपर्यंत सुरू असते. नेत्यांच्या धाकाने कोणतेही नियम त्यांना आडवे येत नाहीत. दारूमुळे भांडणे, मारामाऱ्या होतात, अनेकदा खुनाच्या घटना घडल्या आहेत. मात्र, त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही. पोलिसांना सर्व माहिती असते. हप्तेगिरीमुळे त्यांचे हात बांधलेले असतात. मटक्याच्या अड्डय़ांचा शहरभर सुळसुळाट आहे. रेल्वे स्थानकांबाहेर, रेल्वे रुळांच्या बाजूला हमखास मटक्यांचे अड्डे कसे असतात, हे अनाकलनीय आहे. गुंडगिरीने कहर केला आहे. पोलिसांचा वचक नाही. अनेक तडीपार गुंड खुलेआम फिरतात. रिक्षाचालकांच्या अरेरावीला सुमार नाही. िपपरी बाजारपेठेतील गुंडगिरीला कंटाळून व्यापाऱ्यांनी चार दिवस मंडई बंद ठेवल्याचे ताजे उदाहरण आहे. जागोजागी पथारीवाल्यांकडून गुंड वसुली करतात आणि पोलीस गुंडाकडून हप्ते घेतात. राजकीय आशीर्वादाने गल्लोगल्ली छोटे-मोठे ‘भाईं’ जन्माला आले आहेत. पोलीस दखल घेत नाहीत आणि घेतलीच तर राजकीय नेत्यांचे फोन सुरू होतात. कुदळवाडी गुन्हेगारांचे आश्रयस्थान आहे. तेथे कोणालाही कायद्याचा धाक नाही. राजकीय पुरस्कृत भाईगिरी मोडून काढली पाहिजे. क्रिकेटच्या सट्टय़ासाठी पिंपरी आघाडीवर आहे. पोलीस कारवाई करत नाहीत. वेळ आलीच तर सट्टेबाज एखादा लिंबू-टिंबू हजर करतो आणि पोलीस त्यावर दिखाऊ कारवाई करतात. पोलिसांची हप्तेगिरी असेपर्यंत गुन्हेगारीला आळा बसणार नाही, हे उघड गुपित आहे. अपुरे मनुष्यबळ, कामाचे जादा तास, वरिष्ठांकडून होणारी छळवणूक, राजकीय हस्तक्षेप या पोलिसांच्या समस्याही आहेत.