पिंपरी पालिका शिक्षण मंडळाचे सभापती फजल शेख यांची मुदत संपल्याचे सांगत त्यांचा राजीनामा घ्यावा आणि नव्या सदस्याला सभापतिपदाची संधी द्यावी, अशी मागणी सत्तारूढ राष्ट्रवादीच्याच सदस्यांनी महापौर शकुंतला धराडे तसेच पक्षनेत्या मंगला कदम यांच्याकडे केली आहे.
फजल शेख यांची निर्धारित वर्षभराची मुदत संपून तीन आठवडे झाले तरी ते राजीनामा देत नसल्याने ‘प्रतीक्षा’ यादीत असलेल्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता त्यांनी एका निवेदनाद्वारे नेत्यांकडे व्यक्त केली आहे. फजल शेख यांची गेल्या वर्षी सभापतिपदावर निवड झाली, तेव्हा वर्षभरानंतर त्यांनी राजीनामा द्यायचा, असे ठरले होते. मुदत संपली तरी सभापतींचा राजीनामा देण्याचा विचार नसल्याने प्रतीक्षेतील सदस्य अस्वस्थ झाले आहेत. फजल शेख तसेच उपसभापती सविता खुळे वगळता अन्य सदस्यांनी एकत्रितपणे निवेदन तयार करून नेत्यांना दिले असून शेख यांचा राजीनामा घेऊन नव्या सभापतीची निवड करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील वातावरण ढवळून निघाले आहे.
पिंपरी शिक्षण मंडळात राष्ट्रवादीचे निर्विवाद बहुमत आहे. मात्र, लोकसभा-विधानसभेनंतर शहरातील राजकारणात उलथापालथ झाली, त्याचे पडसाद शिक्षण मंडळातही उमटत आहेत. मंडळात फजल शेख, सविता खुळे वगळता शिरीष जाधव, निवृत्ती शिंदे, विजय लोखंडे, धनंजय भालेकर, चेतन घुले, चेतन भुजबळ, नाना शिवले, श्याम आगरवाल, विष्णुपंत नेवाळे हे सदस्य आहेत. त्यापैकी दोन काँग्रेसचे आहेत. सध्या राष्ट्रवादीतील वातावरण गढूळ आहे, नेत्यांमध्ये असलेली गटबाजी उफाळून आलेली आहे. पक्षनिष्ठ व गद्दार अशी विभागणी करण्यात येत आहे. त्यात नव्या सभापतीचा निर्णय घेताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तथापि, निर्णयच न घेतल्यास बंडाळी होण्याची शक्यताही आहे.