राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका; ‘भाई, भाऊ, दादाला साहेबांमुळे प्रतिष्ठा’

भाजप किंवा शिवसेनेच्या हातात सत्ता दिल्यास गुंड आणि दलालांच्या हातात शहर जाईल, अशी भीती व्यक्त करतानाच शहराचा आणखी विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करा आणि राष्ट्रवादीला पुन्हा सत्ता द्या, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले. ‘भाई’ काय, ‘भाऊ’ काय आणि ‘दादा’ काय, तुम्हाला कोण ओळखत होते. शरद पवार यांनी तुम्हाला नाव, प्रतिष्ठा मिळवून दिली, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांवर केली.

महापालिका निवडणुकांना जेमतेम पाच दिवस राहिल्याने अजित पवारांनी बुधवारी बालेकिल्ल्यात धाव घेतली. एक-दोन नव्हे तब्बल आठ सभा त्यांनी एकाच दिवशी िपपरी-चिंचवडमध्ये घेतल्या. पवार म्हणाले, अनेकांना नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौरपद देऊन ताकद दिली. मात्र, निष्ठा बदलून ते इतरत्र गेले. ते शहरासाठी काय करणार आहेत. सत्तेसाठी सरडय़ासारखा रंग बदलणारे काही कामाचे नाहीत. पिंपरी-चिंचवडचा विकास देशातील इतर शहरांपेक्षा जास्त आहे म्हणूनच ‘बेस्ट सिटी’ म्हणून गौरव झाला. राष्ट्रवादीच्या हातात सत्ता दिली आणि शहराचे काही बरे-वाईट झाल्यास त्याची जबाबदारी मी घेतो. मात्र, शिवसेना किंवा भाजपच्या हाती सत्ता गेल्यास ती जबाबदारी कोण घेणार आहे. उद्धव ‘मातोश्री’त बसणार आणि भाजपच्या हातात सत्ता दिल्यास नागपूरला जावे लागेल. शिवसेनेच्या चार नेत्यांची तोंडे चार दिशेला आहेत. भाजप-सेनेच्या मंडळींना शहराचे काही पडलेले नाही. फक्त निवडणुका आल्या की त्यांना शहर आठवते. अडीच वर्ष झाली शास्ती कर, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न त्यांनी सोडविला नाही.

तुमचा आमदार भानगडी करायचा

अपक्ष म्हणून निवडून आलेल्या तुमच्या भोसरीच्या आमदाराला खासगीत विचारा, तो काय भानगडी करायचा आणि मी त्याला किती वेळा वाचवला आहे. भंगार विकायचा तिथे अडकला, जकातीत घोटाळा करताना पकडला, वारंवार सांगूनही सुधारला नाही. तुला टायरमध्ये घालावे लागेल, असा दमही भरावा लागला, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार महेश लांडगे यांना उद्देशून टीका केली. तर, शहराच्या विकासाऐवजी स्वत:चा विकास करत व्यवसाय कसा वाढेल आणि ‘टीडीआर’मध्ये कसे जास्त पैसे मिळतील, याचाच विचार केला, अशी टीका आमदार लक्ष्मण जगताप यांना उद्देशून केली.