पिंपरी पालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुका एकदाच्या पार पडल्या. गुरूवारी (२३ फेब्रुवारी) निकालानंतर शहराचे राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. १५ वर्षांपासून पिंपरी पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. दोन वेळा स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या राष्ट्रवादीला निर्विवाद बहुमताची हॅट्ट्रिक मिळणार, की ‘परिवर्तना’चे आवाहन करणाऱ्या भाजप अथवा शिवसेनेला संधी मिळणार, याविषयी राजकीय वर्तुळात उत्कंठा आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास पिंपरीत काहीही होऊ शकते. एखादा ‘नवा पॅटर्न’ अस्तित्वात येऊ शकतो. तसे संकेत निवडणूक काळातही मिळत होते.

‘इतकेच मला जाताना,

मतदान केंद्रावर कळले होते.

मतदानाने केली एकदाची सुटका,

प्रचाराने अतोनात छळले होते!’

‘सोशल मीडिया’वर फिरणाऱ्या या सूचक चारोळीतून पिंपरी-चिंचवड शहरातील मतदारांची भावना जणू व्यक्त झाली होती. कारण, गेल्या सहा महिन्यांपासून शहरात  निवडणुकांचे वातावरण होते. गेल्या महिनाभरात खूपच उलथापालथ झाल्याने ते खूपच तापले होते. उमेदवारांच्या अटीतटीच्या स्पर्धेत आणि त्यांच्या चित्रविचित्र प्रचारपध्दतीमुळे मतदारांना प्रचंड डोकेदुखी सहन करावी लागली. शेवटच्या टप्प्यात उमेदवार हातघाईला आल्याने मतदारांना ‘नको-नको’ झाले होते. अखेर, २१ फेब्रुवारी हा मतदानाचा दिवस उजाडला आणि पिंपरी पालिकेच्या बहुचर्चित सातव्या पंचवार्षिक निवडणुका एकदाच्या पार पडल्या. ‘दहा गाव दुसरी, एक गाव भोसरी’चा प्रत्यय देत भोसरीतील धावडे वस्ती प्रभागाचे भाजपचे उमेदवार रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित १२७ जागांसाठी ७७३ उमेदवार रिंगणात राहिले, त्यांचे राजकीय भवितव्य मंगळवारी ‘वोटिंग मशिन’ मध्ये बंद झाले. ही श्रीमंत पालिका कुणाची? राष्ट्रवादीची, भाजपची की शिवसेनेची याविषयी सर्वानाच उत्कंठा आहे. गुरूवारी (२३ फेब्रुवारी) मतमोजणी होणार आहे. सकाळपासून हळूहळू या रहस्याचा पडदा उघडू लागेल. तोपर्यंत सर्वाच्याच मनात धाकधुक राहणार आहे.

यंदाची निवडणूक अनेक अर्थाने वैशिष्टय़पूर्ण ठरली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुका एकतर्फी होत होत्या, या वेळी तसे झाले नाही. सुरूवातीला काँग्रेस व नंतरच्या काळात राष्ट्रवादीने पालिका सहजपणेजिंकून आपल्या ताब्यात ठेवली. २०१७ च्या निवडणुकांचे वेगळेपण म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित ‘दादा’ पवार यांच्यासारख्या ‘पॉवरफुल्ल’ नेत्यांपुढे त्यांच्याच पूर्वाश्रमीच्या लक्ष्मण ‘भाऊ’ जगताप, महेश ‘दादा’ लांडगे, आझम ‘भाई’ पानसरे आदी अनुयायांनी आव्हान उभे केले. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याचा भाजपला या निवडणुकीसाठी चांगला फायदा झाला. राष्ट्रवादीचे चांगले दिग्गज नेते भाजपमध्ये आले. राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचे तर भाजपचा जोर वाढल्याचे चित्र त्यामुळेच पुढे आले. संपूर्ण निवडणूक ही ‘भाजप विरूद्ध राष्ट्रवादी’ अशीच रंगली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चिंचवड, पिंपरीत झालेल्या सभा, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आकुर्डीतील सभा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भोसरी-सांगवीत झालेली सभा तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आदी नेत्यांच्या सभांमुळे वातावरण ढवळून निघाले. पिंपरी पालिकेची सत्ता टिकवण्यासाठीच अजित पवारांनी शहरात तळ ठोकला होता. भाजप-राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये अनेक ठिकाणी काटय़ाची स्पर्धा आहे. काही  ठिकाणी शिवसेनेचा जोर आहे. स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा उद्धव यांचा निर्णय शिवसैनिकांच्या मनासारखाच होता. भाजपशी असलेल्या युतीमुळे अनेक ठिकाणी शिवसेनेला वर्षांनुवर्षे डोके वर काढता आले नव्हते, ही त्यामागची खंत होती. मात्र, तरीही भाजप-शिवसेनेने युती करून लढावे, अशी मानसिकता असणारा वर्गही शहरात होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या पातळीवर युतीसाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, युतीतील दोन्ही पक्षाच्या नेत्यांना युती करायचीच नव्हती, हे नंतर उघड झाले. युतीत काडीमोड झाला, तेव्हाच काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले, त्यामुळे उमेदवारांना अनेक पर्याय उपलब्ध झाले. राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तिकिटासाठी तीव्र स्पर्धा होती. त्यामुळे राष्ट्रवादीकडे उमेदवारी न मिळालेले भाजपमध्ये गेले. त्याचपध्दतीने, भाजपमध्ये डावलण्यात आलेले राष्ट्रवादीत गेले. दोन्हीकडे ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांनी शिवसेनेचा रस्ता धरला. पक्षनिष्ठा हा प्रकार कुठेही राहिला नसल्याचे वास्तव उघड झाले. ‘आयाराम-गयाराम’ने कळस गाठला. उमेदवारांनी मिळेल ते तिकीट पदरात पाडून घेतले. मूळ निष्ठावंतांवर बहुतेक ठिकाणी अन्याय झाल्याची उदाहरणे आहेत. भाजपमध्ये तो प्रचाराचा मुद्दा ठरला. ‘जिंकण्यासाठी काहीपण’चे सूत्र ठेवून राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुक काळात सर्व ‘तंत्र-मंत्र’ वापरले गेले. पैशाचा जाळ आणि धूर काढणारे उमेदवार जागोजागी होते म्हणूनच एका मताला दोन हजार रूपयांचा सरासरी भाव होता. काही ठिकाणी आठ हजार रूपयांपर्यंतची सौदेबाजी झाली, हे पाहता निवडणुका कोणत्या दिशेने चालल्या आहेत आणि त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिल्यात का, असा मुद्दा नव्याने चर्चेत आला.

आता निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी सत्तेची हॅट्ट्रिक करणार , का परिवर्तन होऊन भाजप किंवा शिवसेनेला संधी मिळणार , याविषयी तर्कवितर्क मांडले जात आहेत. काँग्रेस, मनसे, रिपाइं, एमआयआमचे भवितव्य ठरणार आहे. कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यास कोणते दोन पक्ष एकत्र येतील, हा उत्सुकतेचा मुद्दा आहे. राष्ट्रवादी-शिवसेना हा नवीन पॅटर्न पिंपरीत उदयाला येईल की पारंपरिक मित्रपक्ष असलेले भाजप-शिवसेना झालं-गेलं विसरून पुन्हा एकत्र येतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकांच्या निकालावर पुढील लोकसभा व विधानसभेची गणिते ठरणार आहेत, त्यामुळे महापालिकांचे निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत.

‘सामना’ अटीतटीचा

शहरभरात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या आहेत, ज्याच्या निकालाची मोठय़ा प्रमाणात उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. भोसरीत अजित गव्हाणे विरूद्ध सचिन लांडगे, इंद्रायणीनगरमध्ये विक्रांत विलास लांडे-सारंग कामतेकर, सांगवीत प्रशांत शितोळे-अतुल शितोळे-हर्षल ढोरे, चिंचवड शाहीनगरला मंगला कदम-शारदा बाबर, निगडीत सुलभा उबाळे-सुमन पवळे-अश्विनी चिखले-संगीता पवार,पिंपरीगावात उषा वाघेरे-ज्योतिका मलकानी-सुनीता वाघेरे, संत तुकारामनगरमध्ये योगेश बहल-यशवंत भोसले, पिंपळे निलखला सचिन साठे-विलास नांदगुडे, नव्या सांगवीत राजेंद्र जगताप-नवनाथ जगताप आदींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

महापौर शकुंतला धराडे या भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक मानल्या जात होत्या. मात्र, त्या जगताप यांच्या पिंपळे गुरव बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते अजित गव्हाणे यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, भाजप आमदार महेश लांडगे यांनी त्यांचे सख्खे बंधू  सचिन उर्फ भैया लांडगे यांनाच त्यांच्यासमोर उतरवल्याने चुरस निर्माण झाली. माजी आमदार विलास लांडे यांनी चिरंजीव विक्रांत लांडे यांना रिंगणात उतरवले. मात्र, त्याच ठिकाणी आमदार जगताप यांचे ‘उजवे हात’ मानले जाणारे सारंग कामतेकर रिंगणात आहेत. सांगवीत स्थायी समितीचे दोन माजी अध्यक्ष भिडले. अतुल शितोळे यांना उमेदवारी मिळाली आणि प्रशांत शितोळे यांचा पत्ता कापला गेला. दोन्ही शितोळेंना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या ढोरे परिवारातील हर्षल ढोरे यांचे कडवे आव्हान होते. पालिकेच्या सर्वेसर्वा म्हणून राहिलेल्या राष्ट्रवादीच्या पक्षनेत्या मंगला कदम यांचा माजी खासदार गजानन बाबर यांच्या परिवारातील नगरसेविका शारदा बाबर यांच्याशी सामना आहे. निगडीत शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, मनसेच्या अश्विनी चिखले, भाजपच्या संगीता पवार आणि राष्ट्रवादीच्या सुमन पवळे या तीन नगरसेविका व एक माजी स्थायी समिती अध्यक्षात लढत आहे. पिंपरीगावात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे, नगरसेविका सुनीता वाघेरे आणि माजी नगरसेविका ज्योतिका मलकानी यांच्यात चुरस आहेत. पिंपळे निलखला सचिन साठे आणि विलास नांदगुडे तिसऱ्यांदा आमने-सामने आहेत. नाना काटे-शीतल काटे, मयूर कलाटे-स्वाती कलाटे, सतीश दरेकर-माधुरी दरेकर, सचिन चिखले-अश्विनी चिखले या दाम्पत्यांनी एकत्रित निवडणुका लढवल्या आहेत.