पिंपरी-चिंचवडच्या महापौर म्हणून काम करताना आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य होते. आपल्या कामात कोणी हस्तक्षेप केला नाही आणि कोणाचाही ‘रिमोट कंट्रोल’ आपल्यावर चालला नाही, असे महापौर शकुंतला धराडे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भरीव विकासकामांमुळे शहराची वाढ मोठय़ा प्रमाणात होत आहे, त्या दृष्टीने विचार करून भविष्यकालीन नियोजन हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महापौर झाल्याचा दिवस आपल्या दृष्टीने सर्वाधिक आनंदाचा होता. शरद पवार यांनी आस्थेने विचारपूस केली, तो क्षण कायम लक्षात राहील. प्रारंभी महापौर होणार, या कल्पनेने भीती वाटली होती. मात्र, सर्वानी समजावून आणि सांभाळून घेतले. काही चुका झाल्या. मात्र, चुकताना शिकतही गेले. थोडय़ा कुरबुरी होतच होत्या. १४ महिन्यांच्या महापौरपदाच्या कालावधीत खूप चांगले अनुभव आले. तालेरा रुग्णालयाचे विस्तारीकरण, बीआरटी अशी खूप कामे मार्गी लागली. सभा तहकुबीचे प्रमाण जास्त होते. मात्र, तसे करणे हा पक्षाचा निर्णय होता. महापौर म्हणून सर्व निर्णय स्वत: घेतले, कोणाचाही रिमोट कंट्रोल नव्हता. यापुढेही करण्यासारखे भरपूर आहे. शहर वाढते आहे. त्या दृष्टीने नियोजन हवे. स्वच्छता, रस्ते, पाणी आदी पायाभूत सुविधांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. प्रदूषण रोखण्यासाठी मोठय़ा प्रमाणात झाडे लावावी लागतील. सव्वा वर्षांची मुदत संपली असली, तरी राजीनाम्याच्या विषयावर महापौरांनी सूचक मौन साधले. यापूर्वी, मंगला कदम, योगेश बहल, मोहिनी लांडे यांनी अडीच वर्षांचे महापौर भूषवले असल्याने धराडे यांच्या शांततेमागे अघोषित मुदतवाढ मिळावी, अशीच अपेक्षा असल्याचे दिसून येत होते.

पालकमंत्र्यांच्या निर्णयांची अंमलबजावणी नाही!
पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी पालिकेत येऊन शहरातील विविध प्रश्नांसाठी बैठक घेतली. त्या वेळी अनेक निर्णय घेतले. मात्र, त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने काही पावले उचलली असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया महापौरांनी व्यक्त केली. शहरातील गुन्हेगारी कारवायांचे प्रमाण वाढले आहे, त्यावर कठोर उपाययोजना व्हायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.