पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे परदेश दौऱ्याहून परतल्यानंतर आता महापौर बदलाच्या विषयाने पुन्हा जोर धरला आहे. राजीनामा देण्याच्या बिलकूल मन:स्थितीत नसलेल्या महापौर धराडे यांनी, अजित पवार यांनी सांगितल्यास तत्काळ राजीनामा देऊ, अशी भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, आपण वयाने व अनुभवाने ज्येष्ठ असल्याने महापौरपदाची संधी आपल्यालाच मिळेल, असा युक्तिवाद रामदास बोकड यांनी केला आहे.
महापौरांची सव्वा वर्षांची मुदत संपत आली आहे. सत्तारूढ राष्ट्रवादीकडून महापौरांचा राजीनामा घेऊन नव्या चेहऱ्याला संधी देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तथापि, त्याआधीच महापौरपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. महापौरांनी ‘जाता-जाता’ परदेश दौऱ्याची हौस भागवून घेतली, नुकत्याच त्या स्पेनवरून परतल्या आहेत. त्यामुळे चर्चेने पुन्हा जोर धरला. महापौरपदासाठी सव्वा वर्षांचे ठरल होते. मात्र, अद्याप राजीनामा द्या, असे कोणी सांगितले नाही. तथापि, अजितदादांनी सूचना केल्यास राजीनामा देऊ, असे धराडे यांनी स्पष्ट केले आहे. महापौरपदाच्या स्पर्धेत पिंपळे गुरवचे रामदास बोकड आणि दिघीच्या आशा सुपे असे दोनच सदस्य आहेत. बोकड यांनी आपल्या ज्येष्ठतेच्या मुद्दय़ावरून ‘मार्केटिंग’ सुरू केले आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक असल्याचा शिक्का, ही त्यांच्या दृष्टीने अडचण आहे. मात्र, आपण लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीच्याच उमेदवारांचे काम केले, असा दावा ते करत आहेत. जगतापांशी आपले घरगुती संबंध आहेत. मी त्यांचा मोठा भाऊ आहे, असे सांगत राजकीय बाबतीत आपण पक्षनिष्ठ असल्याचे बोकड यांनी म्हटले आहे. तर, सुपे यांनीही महापौरपदावर जोरदार दावा केला आहे.