पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे सोमवारी स्पेनच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. या दौऱ्यासाठी आपण जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. पालिकेच्या दोन सर्वसाधारण सभा असल्याचे कारण या दौऱ्यासाठी आपण जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र महापौरपदावरून पायउतार होण्यापूर्वी जाता-जाता परदेश दौऱ्याची हौस त्यांनी भागवून घेतली आणि सभेच्या दिवशीच परदेशी उड्डाण केले.
स्पेन येथे १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड २०१५’ या परिषदेत सहभागी होण्यासाठी महापौर जाणार होत्या. संयोजकांकडून आमंत्रण आल्यानंतर महापौर व त्यांच्यासमवेत जाणाऱ्या नगरसेवकांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली होती. महापौरांसाठी सव्वा वर्षांची मुदत निर्धारित करण्यात आली आहे, त्यातील १४ महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे ‘जाता-जाता’ परदेशात जाण्याची महापौरांची इच्छा असल्याने स्थायी समितीने ठराव कायम होण्याची वाट न पाहता मंजुरी देण्याची तत्परता दाखवली होती. मात्र, काहीतरी अडथळा आल्याने १६ आणि २० नोव्हेंबरला दोन स्वतंत्र सभा असल्याचे कारण देत आपण दौऱ्यात सहभागी होणार नसल्याचे महापौरांनी जाहीर केले होते. वास्तविक त्यांना परदेश दौऱ्याला जायचेच होते. नंतर कधी संधी मिळेल की नाही, अशी शंका असल्याने त्यांचे प्रयत्न सुरूच होते. अखेर, व्हिसा व अन्य गोष्टी जुळून आल्याने सर्व कार्यक्रम रद्द करून त्या तातडीने परदेशी रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासमवेत उपमहापौर प्रभाकर वाघेरे व अन्य नगरसेवक असल्याचे सांगण्यात येते. महापौर तसेच उपमहापौरही नसल्याने सोमवारी होणारी तहकूब सभा पुन्हा तहकूब करण्याची वेळ प्रशासनावर आली.