दिवसभर पालिकेचे कामकाज ठप्प; नागरिकांची गैरसोय

पिंपरी पालिकेच्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी दिवसभर दंग होते. त्यामुळे पालिका सुरू असतानाही कामकाज मात्र दिवसभर ठप्प होते. या ‘उत्सवी’ वातावरणात काम करण्याची कोणाचीही मानसिकता नव्हती, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

वर्धापनदिनानिमित्त मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यालय इमारतीला रात्रीपासूनच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पालिकेच्या तळमजल्यावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळपासूनच महापालिकेत उत्सवी वातावरण होते. अधिकारी व कर्मचारी आपल्या नेहमीच्या जागेवर दिसून येत नव्हते. सकाळी अण्णासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून वर्धापनदिनाला सुरुवात झाली. मुख्यालयासमोरच रस्सीखेच स्पर्धा, संगीतखुर्ची आदी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यासह नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. महिला कर्मचाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पालिका मुख्यालयात प्रवेश करता येत नव्हता. कारण, पायऱ्यांवरच कर्मचारी बसले होते. रक्तदान शिबिर, नेत्रदानाचे अर्ज भरून घेणे, खेळ पैठणीचा, रांगोळी, पाककला स्पर्धा, अभिरूप महासभा, ‘गीत संगीत’ हा कार्यक्रम, यशस्वी उद्योजक, गुणवंत कामगारांचा सत्कार आदी कार्यक्रम दिवसभर होत होते. त्यात सहभागी होण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांच्यात चढाओढ होती. काम करण्याची कोणाचीही मानसिकता दिसून येत नव्हती. अनेक नागरिक पालिका मुख्यालयात कामासाठी आले होते. मात्र, येथील रागरंग पाहून ते परत निघून गेले. ज्यांना वर्धापनदिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे नव्हते, ते हजेरी लावून निघून गेले. त्यामुळे अनेक कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. यासंदर्भात, ज्यांनी ‘कुरकूर’ केली, त्यांना ‘आजचा दिवस हे असे चालणारच, थोडे समजून घ्या’, असे सांगितले जात होते.