पिंपरीच्या राजकारणात ‘भारतीय जनता पक्ष विरूद्ध सर्व’ असा संघर्ष निर्माण झाला आहे. कोणत्याही विषयाचे निमित्त मिळाले तरी हा संघर्ष उफाळून येत आहे. गुरूवारी पालिकेचे अंदाजपत्रक मंजूर करण्यावरूनही भाजपला ‘लक्ष्य’ करण्याच्या हेतूने सर्व विरोधक एकत्र आले होते.

लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर पिंपरी-चिंचवड शहरात भाजपची ताकद बऱ्यापैकी वाढली व त्याचा प्रत्यय पालिका निवडणुकीत आला. बलाढय़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील पिंपरी पालिकेची सत्ता भाजपने खेचून आणली. पालिकेच्या सर्वच पदांवर भाजपचे नगरसेवक आहेत आणि भाजप म्हणेल ती पूर्व दिशा, असे  पिंपरी पालिकेचे सध्याचे राजकारण झाले आहे. भाजपच्या काही नेत्यांची सध्या मनमानी सुरू आहे, त्याच्या विरोधात इतर पक्ष एकवटले आहेत. यापूर्वी, प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या काळात ‘भाजप विरूद्ध सर्व’ असा संघर्ष दिसून आला होता. त्याचीच पुनरावृत्ती गुरूवारी अंदाजपत्रक मंजुरीच्या सभेत झाली. अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी आयोजित केलेल्या विशेष सभेत भाजपने मनमानी केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. अंदाजपत्रक मंजूर केल्यानंतर त्यावर चर्चा सुरू करण्यात आली. कोणालाही चर्चा करू दिली नाही व उपसूचना स्वीकारण्यात न आल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. भाजपच्या या मनमानीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी, शिवसेना व मननेने एकत्रितपणे सभात्याग केला. ही विरोधकांची ‘स्टंटबाजी’ असल्याचे प्रत्युत्तर भाजपनेही दिले. शुक्रवारी पुन्हा यावरून पत्रकबाजी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. भाजपकडून आर्थिक शिस्त लावण्यात येत असून विरोधकांना ते सहन न झाल्याने त्यांनी सभात्याग केल्याचा आरोप गटनेते एकनाथ पवार यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरातील राजकारण हळूहळू रंगू लागले आहे. भाजपला शहरातील तीनही जागाजिंकायच्या आहेत. तर, विरोधकांना भाजपचा पराभव घडवून आणायचा आहे. राज्यातील सत्तेत एकत्र असले तरी पिंपरीत भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सातत्याने खटके उडताना दिसत आहेत. दिवंगत  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावरून झालेला संघर्ष ताजा असतानाच अंदाजपत्रकावरून पुन्हा भाजप-सेनेत खटके उडाले.

राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपचे उट्टे काढायचे आहे. त्यामुळे त्यांचा भाजपविरोधी सूर आहे व इतरांनी त्यांना साथ दिली आहे. सद्य:स्थितीत, राष्ट्रवादीची भूमिका दुटप्पी असल्याचे दिसून येते. काही जण भाजपशी संघर्ष करत असतानाच अनेकांचे भाजपशी अंतस्थ साटेलोटे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.