पिंपरी पालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मंगळवारी दुपारी ठरणार आहे. १६ जणांच्या समितीत १२ सदस्य राष्ट्रवादीचे असून सर्वच्या सर्व अध्यक्षपदासाठी तीव्र इच्छुक आहेत. ऐनवेळी कोणाच्या नावाची लॉटरी लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अध्यक्षपदासाठी शनिवारी (सात मार्च) निवडणूक होणार असून मंगळवारी दुपारी तीन ते पाचमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुपापर्यंत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल. स्थायी समितीत राष्ट्रवादीचे कैलास थोपटे, डब्बू आसवानी, शांताराम भालेकर, बाळासाहेब तरस, अतुल शितोळे, प्रसाद शेट्टी, विनायक गायकवाड, अनिता तापकीर, सविता साळुंके, संध्या गायकवाड, सुनिता गवळी, रमा ओव्हाळ यांचा समावेश आहे. बाराही सदस्य अध्यक्षपदासाठी इच्छुक असून आपापल्या पध्दतीने त्यांनी नेत्यांकडे मोर्चेबांधणी केली आहे. अजितदादांनी अद्याप कोणालाही कौल समजू दिला नाही. ऐनवेळी ते घोषणा करणार आहेत. गेल्या तीन वर्षांत जगदीश शेट्टी, नवनाथ जगताप, महेश लांडगे यांना संधी मिळाली. दोन वर्षांनी होणाऱ्या पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यंदाचा अध्यक्ष ठरणार आहे. स्थानिक नेत्यांच्या संगनमताच्या राजकारणात थेट कोणाच्या नावाचा शिक्का नसलेले नाव निवडण्याचा अजितदादांचा प्रयत्न राहणार असून महिलेला संधी मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे. विरोधकांचे संख्याबळ अत्यल्प आहे. काँग्रेसचे जालींदर शिंदे, विमल काळे, शिवसेनेचे धनंजय आल्हाट, संपत पवार असे चार सदस्य आहेत. त्यामुळे विरोधकांकडून उमेदवारी अर्ज दाखल होईल का, इथपासून सुरुवात आहे.