एकीकडे बचतीची भाषा, प्रत्यक्षात उधळपट्टीचे प्रस्ताव

पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी दरम्यानच्या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. करोनामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या संकटकाळात आणि पालिकास्तरावर दररोज बचतीची भाषा केली जात असताना, या खर्चाची गरज आहे का, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

पिंपरी ते निगडी हा १२ किलोमीटरचा रस्ता आहे. जेमतेम १५ ते २० मिनिटांत हे अंतर कापले जाते. अतिशय सुस्थितीत असणारा आणि वेगवान रस्ता म्हणून हा मार्ग ओळखला जातो. महापालिकेने विविध कारणास्तव या मार्गावर गेल्या १५ वर्षात ५०० कोटींहून अधिक खर्च केला आहे. आता सुशोभीकरणाच्या नावाखाली नव्याने १०० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे. दापोडी हॅरिस पूल ते आंबेडकर चौक, पिंपरी आणि पिंपरी चौक ते भक्ती शक्ती चौक, निगडी अशा दोन टप्प्यात हे काम होणार आहे. प्रत्येक भागासाठी ५० कोटी रुपये याप्रमाणे एकूण १०० कोटी खर्च अपेक्षित आहे. या खर्चास यापूर्वीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. स्थायी समितीची मान्यता मिळणे बाकी आहे.

याअंतर्गत दापोडी ते निगडी दरम्यान सलग पदपथ तसेच स्वतंत्र सायकल मार्ग तयार करण्याचे नियोजन आहे. जागा उपलब्ध झाल्यास वाहतळाची सोय करण्याचाही विचार आहे. आवश्यकतेनुसार, बागकाम तसेच वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

निगडी-दापोडी मार्गावर विविध नूतनीकरणाची तसेच सुशोभीकरणाची कामे होणार आहेत. रस्ते उत्तम आहेत. त्यामुळे रस्त्याचे कोणतेही काम त्यात समाविष्ट नाही. सलग पदपथ आणि सायकल मार्गाचे तसेच जागांच्या उपलब्धतेनुसार वाहनतळांचे नियोजन आहे. ‘स्मार्ट सिटी’तील ‘मॉडेल वॉर्ड’ आणि इंदोर शहरातील विकसित रस्ते डोळ्यासमोर आहेत. शहराचा प्रमुख रस्ता सर्वार्थाने सुशोभित असावा, अशी आयुक्तांची भूमिका आहे. मेट्रोशी समन्वय साधून ही कामे केली जाणार आहेत.

– श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, पिंपरी पालिका